प्राध्यापक आणि कर्मचाऱ्यांचे पगार १ तारखेला होणार; उच्च शिक्षण संचालनालयाचे मोठे आदेश

दैनिक स्थैर्य • WhatsApp Channel
सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या
थेट WhatsApp वर मिळवा
WhatsApp Channel JOIN करा

उच्च शिक्षण संचालनालयाने राज्यातील अशासकीय अनुदानित महाविद्यालये व विद्यापीठांतील शिक्षक-शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे पगार दरमहा १ तारखेला करण्याचे आदेश दिले आहेत.

स्थैर्य, सातारा, दि. २३ सप्टेंबर : राज्यातील अशासकीय अनुदानित महाविद्यालये तसेच अकृषि विद्यापीठांमधील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या वेतनाबाबत उच्च शिक्षण संचालनालयाने अत्यंत महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. कर्मचाऱ्यांची आर्थिक सुरक्षा जपण्यासाठी आणि वेतन प्रक्रियेत पारदर्शकता आणण्यासाठी दरमहा १ तारखेला पगार करण्याचे स्पष्ट निर्देश संचालनालयाकडून देण्यात आले आहेत. या निर्णयामुळे हजारो प्राध्यापक आणि कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.

वेतन अनुदानासाठी नवी नियमावली

संचालनालयाने जारी केलेल्या आदेशानुसार, नियमित वेतनासोबतच तासिका तत्त्वावरील प्राध्यापकांचे मानधन, अर्जित रजा रोखीकरण आणि वैद्यकीय प्रतिपूर्तीसाठीचे अनुदान मागणी प्रस्ताव दरमहा २० तारखेपर्यंत संचालनालयाकडे सादर करणे बंधनकारक करण्यात आले आहे. ही मागणी संबंधित संस्था किंवा कार्यालय प्रमुखांच्या स्वाक्षरीनेच सादर करावी लागणार आहे. या नियमामुळे बीडीएस (BDS) प्रणालीवर वेळेत निधी उपलब्ध होऊन वेतन प्रक्रिया सुरळीत होण्यास मदत होणार आहे.

विलंब टाळण्यासाठी कडक शिस्त

अर्जित रजा रोखीकरण आणि वैद्यकीय बिलांच्या मागण्या सादर करताना केवळ मोघम माहिती न देता, त्यासोबत अधिकृत मंजुरी आदेश जोडणे बंधनकारक करण्यात आले आहे. या नव्या वेळापत्रकामुळे प्रशासकीय दिरंगाईला आळा बसणार असून कर्मचाऱ्यांना दरमहा वेळेवर वेतन मिळणे शक्य होणार आहे. संचालनालयाच्या या निर्णयाचे शैक्षणिक क्षेत्रातून स्वागत केले जात आहे.

 

Back to top button
Don`t copy text!