
थेट WhatsApp वर मिळवा
सणासुदीच्या काळात आणि मिरवणुकांमध्ये सार्वजनिक रस्त्यांवर फटाके फोडण्यास मुंबई उच्च न्यायालयाने पूर्णपणे बंदी घातली आहे.
स्थैर्य, सातारा, दि. २३ सप्टेंबर : वाढते वायू आणि ध्वनी प्रदूषण रोखण्यासाठी मुंबई उच्च न्यायालयाने अत्यंत कठोर पाऊल उचलले आहे. सण-उत्सव आणि मिरवणुकांदरम्यान सार्वजनिक रस्त्यांवर फटाके फोडण्यावर न्यायालयाने पूर्णपणे बंदी घातली आहे. याशिवाय मिरवणुकांमध्ये डीजे, लाऊडस्पीकर आणि लेझर लाईट्सचा अवाजवी वापर अननावश्यक असल्याचे सांगत प्रशासनाला नियमांची कडक अंमलबजावणी करण्याचे स्पष्ट निर्देश दिले आहेत.
वायू आणि ध्वनी प्रदूषणावर न्यायालयाचे ताशेरे
प्रदूषणाच्या मुद्द्यावर न्यायालयाने स्वतःहून दखल घेत ही सुनावणी पार पाडली. सार्वजनिक रस्त्यांवर फटाके फोडल्यामुळे पादचारी व वाहनधारकांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण होतो आणि हवेची गुणवत्ता खालावते, असे निरीक्षण न्यायमूर्तींनी नोंदवले. सण-उत्सव साजरे करण्यास न्यायालयाचा विरोध नाही, परंतु उत्सव इतरांच्या आरोग्याचा किंवा हक्कांचा बळी देऊन साजरे करता येणार नाहीत, असे उच्च न्यायालयाने स्पष्ट केले.
नियमांचे उल्लंघन केल्यास कठोर कारवाईचे निर्देश
मिरवणुका आणि कार्यक्रमांच्या आयोजकांना मिळालेली लाऊडस्पीकर परवानगी कार्यक्रम स्थळी ठळकपणे प्रदर्शित करणे बंधनकारक करण्यात आले आहे. तसेच नियमांचे उल्लंघन रोखण्यासाठी आयोजकांकडून मोठी सुरक्षा ठेव रक्कम (Security Deposit) घेण्याची सूचनाही न्यायालयाने दिली आहे. निर्धारित डेसिबल मर्यादा ओलांडल्यास किंवा रस्त्यांवर फटाके फोडल्यास प्रशासनाने तातडीने कठोर कारवाई करावी, असे आदेश उच्च न्यायालयाने पोलिसांना दिले आहेत.
