
थेट WhatsApp वर मिळवा
फलटण तालुक्यातील जेष्ठ नेते प्रल्हादराव गोविंदराव साळुंखे – पाटील उर्फ तात्या यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने त्यांच्या कार्याचा आढावा घेत त्यांच्याविषयी मनातलं बोलले आहेत फलटणचे लोकनियुक्त नगराध्यक्ष समशेरसिंह नाईक निंबाळकर; वाचा सविस्तर……
काही नाती रक्ताची नसतात, पण ती रक्ताच्या नात्यांपेक्षाही घट्ट आणि पवित्र असतात. आमच्या म्हणजेच स्वर्गीय हिंदुराव नाईक निंबाळकर (नेते) आणि साळुंखे पाटील कुटुंबाचे नाते अगदी तसेच आहे. आज आदरणीय प्रल्हादराव साळुंखे पाटील, म्हणजेच आम्हा सर्वांचे लाडके ‘तात्या’ यांचा अमृतमहोत्सवी वाढदिवस साजरा होत असताना माझ्या मनात जुन्या आठवणींची मोठी गर्दी झाली आहे.
माझे वडील, स्वर्गीय माजी खासदार हिंदुराव नाईक निंबाळकर (नेते) आणि तात्या यांचे अत्यंत जिव्हाळ्याचे आणि अगदी घरगुती संबंध होते. राजकारणातील चढ-उतारांच्या पलीकडे जाऊन त्यांनी एक घट्ट मैत्री आणि कौटुंबिक बंध जपला होता. नेत्यांच्या पश्चात तात्यांनी आम्हा भावांना कधीच पोरके वाटू दिले नाही. राजकारण किंवा समाजकारण करताना माझ्याकडून एखादी चूक घडली, पाऊल थोडे जरी वाकडे पडले, तर हक्काने माझा ‘कान धरण्याचा अधिकार’ या संपूर्ण फलटण तालुक्यात जर कुणाला असेल, तर तो फक्त तात्यांना आहे! त्यांच्या त्या रागावण्यातही मला नेहमी माझ्या वडिलांचीच माया जाणवते. तात्यांच्या रूपाने मी नेहमीच एका खंबीर आणि पितृतुल्य आधारवडाकडे पाहत आलो आहे.
राजकारणात संघर्ष हा अटळ असतो, पण काही लढाया या अस्तित्वाच्या आणि स्वाभिमानाच्या असतात. फलटण नगर परिषदेवर तब्बल ३० वर्षे विधान परिषदेचे माजी सभापती आणि विद्यमान आमदार श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांची एकहाती सत्ता होती. ही प्रदीर्घ सत्ता आणि प्रस्थापित व्यवस्था बदलणे हे सोपे काम नक्कीच नव्हते. पण माझे बंधू, माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या खंबीर नेतृत्वाखाली आम्ही हा लढा उभारण्याचा निर्णय घेतला. नगरपरिषदेच्या लोकनियुक्त नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत श्रीमंत रामराजे यांचे सुपुत्र श्रीमंत अनिकेतराजे नाईक निंबाळकर यांच्या विरोधात मी उभा राहिलो. तो काळ आमच्यासाठी अत्यंत धामधुमीचा आणि राजकीय कसोटीचा होता.
या ऐतिहासिक लढ्यात, प्रत्येक वळणावर आणि प्रत्येक पेचप्रसंगात तात्यांचे बहुमोल मार्गदर्शन आम्हाला लाभले. “तुम्ही निर्भयपणे पुढे चाला, मी तुमच्या पाठीशी भक्कम उभा आहे,” हा त्यांचा शब्द आम्हाला हत्तीचे बळ देऊन गेला. प्रस्थापितांच्या विरोधात कसा लढा द्यायचा, जनसामान्यांची नाडी कशी ओळखायची आणि माणसांना आपुलकीने कसे जोडायचे, याचे प्रत्यक्ष धडे तात्यांनी या काळात दिले. त्यांच्या अचूक मार्गदर्शनामुळेच आम्ही फलटणमध्ये हे ऐतिहासिक सत्तांतर घडवून आणू शकलो आणि मी लोकनियुक्त नगराध्यक्ष म्हणून विजयी झालो. या विजयात तात्यांच्या आशीर्वादाचा आणि त्यांच्या राजकीय मुत्सद्देगिरीचा वाटा खूप मोठा आहे.
पदे मिळतात आणि जातात, पण माणसांना जपणारी तात्यांसारखी माणसे राजकारणात विरळाच! तात्या हे केवळ एक राजकारणी नाहीत, तर ते माणुसकीचे आणि संघर्षाचे एक चालते-बोलते विद्यापीठ आहेत. आज त्यांच्या अमृतमहोत्सवी वाढदिवसानिमित्त मी त्यांना अत्यंत कृतज्ञतापूर्वक शुभेच्छा देतो.
तात्या, तुमचा आशीर्वाद आणि तुमच्या मार्गदर्शनाची शिदोरी आमच्या पाठीशी कायम अशीच राहू दे. तुम्हाला उत्तम आरोग्य, सुख, समाधान आणि दीर्घायुष्य लाभो, हीच ईश्वरचरणी मनःपूर्वक प्रार्थना!
– समशेरसिंह नाईक निंबाळकर
लोकनियुक्त नगराध्यक्ष, फलटण नगर परिषद.





