
थेट WhatsApp वर मिळवा
सोमंथळी हद्दीत ऊस वाहतूक करणारा ट्रॅक्टर-ट्रेलर पलटी झाल्याने वाहतूक कोंडी झाली. जीवितहानी टळली असून, ग्रामस्थांनी तत्परतेने वाहतूक कोंडी कशी दूर केली?
स्थैर्य, सोमंथळी, दि. २३ नोव्हेंबर : फलटण-बारामती मार्गावरील सोमंथळी गावच्या हद्दीत इंदापूर येथून साखरवाडी कारखान्याकडे ऊस वाहतूक करणारा ट्रॅक्टर-ट्रेलर पलटी झाला. ट्रेलरच्या मागील बाजूचे चाक तुटल्याने हा अपघात घडला. या घटनेत ट्रेलरचे मोठे नुकसान झाले असून, सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही.
रस्त्यावर ऊस विखुरल्याने काही काळ वाहतूक कोंडी
या अपघातामुळे शेतकऱ्याचा ऊस रस्त्यावर विखुरला गेला आणि फलटण-बारामती मार्गावरील वाहतूक काही काळ विस्कळीत झाली. माहिती मिळताच द युवा ग्रामीण पत्रकार संघटनेचे फलटण तालुका अध्यक्ष अमित नवनाथ करचे, उपाध्यक्ष गणेश विलास करचे, सोमंथळीचे सरपंच किरण सोडमिसे आणि ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेतली.
जेसीबीने ट्रेलर हटवला; शेतकऱ्याला नुकसानभरपाईचे आश्वासन
ग्रामस्थांनी जेसीबीच्या साहाय्याने पलटी झालेला ट्रेलर बाजूला करून वाहतूक पुन्हा सुरळीत केली. दरम्यान, विखुरलेला सर्व ऊस गोळा करून शेतकऱ्याला परत दिला जाईल आणि शेतकऱ्याचे नुकसान होऊ दिले जाणार नाही, असे आश्वासन ट्रॅक्टर मालकाने दिले आहे.



