
थेट WhatsApp वर मिळवा
फलटणमध्ये ५४ वे तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शन २५ ते २७ नोव्हेंबर दरम्यान होणार आहे. या प्रदर्शनाचे वेळापत्रक, स्पर्धा आणि सात प्रमुख विषय जाणून घ्या.
स्थैर्य, फलटण, दि. २३ नोव्हेंबर : सातारा जिल्हा परिषद, पंचायत समिती फलटण (शिक्षण विभाग) आणि श्रीराम एज्युकेशन सोसायटी संचलित यशवंतराव चव्हाण हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज फलटण यांच्या वतीने ५४ वे तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे. बुधवार, दि. २५ नोव्हेंबर ते शुक्रवार, दि. २७ नोव्हेंबर दरम्यान यशवंतराव चव्हाण हायस्कूल व ज्युनिअर कॉलेजमध्ये हे प्रदर्शन होईल. इयत्ता सहावी ते बारावीचे विद्यार्थी, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व दिव्यांग विद्यार्थ्यांना यात सहभागी होता येईल.
तीन दिवसांचे सविस्तर वेळापत्रक
बुधवार, दि. २५ नोव्हेंबर रोजी सकाळी ९ ते ११ दरम्यान सहभाग व उपक्रम नोंदणी होईल, दुपारी १२ वाजेपर्यंत साहित्य मांडणी करून दुपारी २ वाजता उद्घाटन समारंभ होईल. गुरुवार, दि. २६ नोव्हेंबर रोजी सकाळी ९ ते दुपारी ४ पर्यंत उपकरण पाहणी व परीक्षण, सकाळी १० ते ५ पर्यंत प्रदर्शन खुले, सकाळी ११ ते दुपारी १ दरम्यान प्रश्नमंजुषा स्पर्धा आणि दुपारी २ ते सायंकाळी ४ पर्यंत वक्तृत्व स्पर्धा पार पडेल. शुक्रवार, दि. २७ नोव्हेंबर रोजी सकाळी ८ ते दुपारी १ पर्यंत उपकरण पाहणी, सकाळी ९ ते दुपारी २ पर्यंत प्रदर्शन खुले, दुपारी १ ते २ दरम्यान शास्त्रज्ञ, शिक्षणतज्ञ व संशोधक युवराज लक्ष्मण गायकवाड यांचे व्याख्यान व सांस्कृतिक कार्यक्रम होईल, तर दुपारी २ ते ४ दरम्यान समारोप व बक्षीस समारंभ होईल.
सात प्रमुख विषय आणि सहभागी होण्याचे आवाहन
प्रदर्शनासाठी उत्तम जीवनासाठी कृत्रिम बुद्धिमत्ता, हरित ऊर्जा व पर्यावरण संवर्धन, गणितीय उपकरणे व संगणकीय विचार, आरोग्य व स्वच्छता, देशी व स्थानिक कृषी पद्धती, ग्रामीण परिवर्तनासाठी विज्ञान आणि आपत्ती व्यवस्थापन हे सात विषय निश्चित केले आहेत. विद्यार्थ्यांनी कोणत्याही एका विषयावर प्रतिकृती, प्रयोग, उपकरण किंवा नाविन्यपूर्ण प्रकल्प सादर करावा तसेच वक्तृत्व व प्रश्नमंजुषा स्पर्धेतही भाग घ्यावा, असे आवाहन श्रीराम एज्युकेशन सोसायटी फलटणचे मानद सचिव सचिन सुभाषराव सूर्यवंशी (बेडके) यांनी केले आहे.



