अलगुडेवाडी स्मशानभूमीचा प्रश्न पेटला; ग्रामस्थांचा आक्रमक इशारा

दैनिक स्थैर्य • WhatsApp Channel
सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या
थेट WhatsApp वर मिळवा
WhatsApp Channel JOIN करा ›

अलगुडेवाडीतील स्मशानभूमीच्या दुरवस्थेमुळे ग्रामस्थांनी आक्रमक भूमिका घेतली असून, अंत्यसंस्काराचा प्रश्न तातडीने न सुटल्यास पुढे काय होणार, याकडे लक्ष लागले आहे.

स्थैर्य, फलटण, दि. 23 नोव्हेंबर : अलगुडेवाडी गावात स्मशानभूमीची बिकट अवस्था निर्माण झाल्याने अंत्यसंस्कार कुठे करायचे, असा प्रश्न ग्रामस्थांसमोर उभा राहिला आहे. या प्रश्नावरून दि. २२ रोजी झालेल्या बैठकीत ग्रामस्थांनी आक्रमक भूमिका घेतल्याची चर्चा असून, गावात कोणाचेही निधन झाल्यास अंत्यसंस्कार ग्रामपंचायत कार्यालयासमोर करण्याचा निर्णय घेतल्याचे सांगितले जात आहे. स्मशानभूमीची देखभाल व स्वच्छता होत नसल्याने ग्रामस्थांमध्ये नाराजी पसरली आहे.

झाडाझुडपे आणि रस्त्यावर अंत्यसंस्काराची वेळ

अलगुडेवाडीतील स्मशानभूमीच्या जागेत गेल्या दोन वर्षांपासून मोठ्या प्रमाणात झाडाझुडपे वाढली आहेत. स्वच्छता, दुरुस्ती आणि आवश्यक सुविधांकडे ग्रामपंचायत प्रशासन, ग्रामसेवक, सरपंच, पंचायत समिती आणि बांधकाम विभागाचे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. अलगुडेवाडी, विडणी तसेच आडळिंगे वस्ती परिसरातील नागरिकांच्या निधनानंतर अंत्यसंस्कारासाठी स्मशानभूमीत जावे लागते, मात्र असुविधांमुळे अनेकदा रस्त्यावरच अंत्यसंस्कार करण्याची वेळ येते, ज्यामुळे अपघाताचा धोका वाढला आहे.

निधीचा सवाल आणि प्रशासनाकडे मागणी

स्मशानभूमीची दुरवस्था असताना ग्रामपंचायतीच्या कारभारावर यापूर्वीही आर्थिक गैरव्यवहाराचे आरोप झाले आहेत, मग स्वच्छता व सुविधांसाठी निधी उपलब्ध होत नाही का, असा सवाल ग्रामस्थ विचारत आहेत. स्मशानभूमीची स्वच्छता करून रस्ता, आवश्यक सुविधा आणि परिसराची दुरुस्ती तातडीने करावी, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे. या प्रश्नाची प्रशासनाकडून दखल घेतली जाते का, याकडे गावाचे लक्ष लागले आहे.

हे देखील वाचा

Back to top button
कॉपी करू नका..!