

शिवराज्याभिषेक दिन आणि अहिल्यादेवी होळकर जयंतीनिमित्त टाकळवाडे येथे आयोजित रक्तदान, मोफत नेत्रतपासणी आणि एनसीएमसी कार्ड नोंदणी शिबिराला मोठा प्रतिसाद मिळाला.
स्थैर्य, टाकळवाडे, दि. ०९ जून : शिवराज्याभिषेक दिन आणि पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जयंतीचे औचित्य साधून टाकळवाडे (ता. फलटण) येथे आयोजित करण्यात आलेल्या भव्य रक्तदान, मोफत नेत्रतपासणी आणि एनसीएमसी कार्ड नोंदणी शिबिराला ग्रामस्थांनी मोठा प्रतिसाद दिला. या शिबिरामध्ये ४२ दात्यांनी रक्तदान केले, तर १६० नागरिकांनी मोफत नेत्रतपासणीचा लाभ घेतला.
विविध उपक्रमांचे आयोजन
जय तुळजाभवानी मंडळ आणि समस्त ग्रामस्थ टाकळवाडे यांच्या वतीने गावातील पद्मावती देवी मंदिर परिसरात या सामाजिक उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. सकाळी सुरू झालेल्या या शिबिरात युवक, महिला आणि ज्येष्ठ नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थिती दर्शवली. यावेळी ४२ तरुणांनी उत्स्फूर्तपणे रक्तदान करून सामाजिक बांधिलकी जपली. आयोजकांच्या वतीने सर्व रक्तदात्यांचा विशेष गौरव करण्यात आला.
मोफत चष्मे वाटप आणि कार्ड नोंदणी
एच. डी. देसाई आय हॉस्पिटलच्या सहकार्याने घेण्यात आलेल्या नेत्रतपासणी शिबिरात १६० नागरिकांच्या डोळ्यांची तपासणी करण्यात आली. यातील सुमारे १०० गरजू लाभार्थींना मोफत चष्म्यांचे वाटप करण्यात आले. तसेच नेत्रदोष आढळलेल्या रुग्णांना पुढील उपचारासाठी वैद्यकीय सल्ला देण्यात आला. यासोबतच राज्य परिवहन महामंडळाच्या बस प्रवासात सवलतीसाठी आवश्यक असलेल्या एनसीएमसी कार्डसाठी ९३ महिला आणि ज्येष्ठ नागरिकांची यशस्वी नोंदणी करण्यात आली.
