
स्थैर्य, सातारा, दि. 8 ऑक्टोबर : सहकार क्षेत्रातील अग्रणी साखर कारखाना अशी ओळख असलेल्या अजिंक्यतारा सहकारी साखर कारखान्याने गाळप झालेल्या उसाला दिवाळीपूर्वीच प्रति टन 100 रुपये हप्ता संबंधित शेतकर्यांच्या बँक खात्यात जमा करून ऊस पुरवठादार सभासद- शेतकर्यांची दिवाळी गोड केली आहे.
शेंद्रे ता. सातारा येथील अजिंक्यतारा सहकारी साखर कारखान्याने 2024- 25 च्या गळीत हंगामात गाळप झालेल्या उसाची प्रति टन 3200 रुपये याप्रमाणे संपूर्ण रक्कम संबंधित शेतकर्यांना अदा केली होती. दरम्यान, कारखान्याचे मार्गदर्शक संचालक, राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री श्रीमंत छ. शिवेंद्रसिंहराजे भोसले आणि संचालक मंडळाने दिवाळीसाठी ऊस पुरवठादार शेतकर्यांना आणखी 100 रुपयांचा दुसरा हप्ता देण्याचा निर्णय घेतला. याबाबत ना. शिवेंद्रसिंहराजे यांनी कारखान्याच्या वार्षिक सभेत आणि बॉयलर अग्निप्रदीपन समारंभात प्रति टन 100 रुपये हप्ता देणार असल्याचे जाहीर केले होते.
त्यानुसार 2024- 25 या गळीत हंगामात गाळप झालेल्या उसाचा प्रति टन 100 रुपये दुसरा हप्ता नुकताच संबंधित शेतकर्यांच्या बँक खाती वर्ग करण्यात आला असून प्रति टन 100 रुपये याप्रमाणे होणारी एकूण रक्कम 5 कोटी 74 लाख रुपये बँक खाती जमा करण्यात आले आहेत, अशी माहिती कारखान्याचे चेअरमन यशवंत साळुंखे यांनी दिली असून संबंधित शेतकर्यांनी आपल्या बँकेच्या शाखेत संपर्क साधावा, असे आवाहन त्यांनी केले आहे. दरम्यान, शेतकर्यांना दिवाळीपूर्वीच प्रति टन 100 रुपयांचा दुसरा हप्ता मिळाल्याने संबंधित शेतकर्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.

