श्रीमंत संजीवराजेंना विधानपरिषदेवर संधी द्या; शिवसैनिकांची मागणी


आगामी विधान परिषद निवडणुकीत सातारा जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांना शिवसेनेची उमेदवारी द्यावी, अशी जोरदार मागणी पश्चिम महाराष्ट्रातील शिवसैनिकांनी केली आहे.

स्थैर्य, सातारा, दि. 23 एप्रिल : आगामी विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सातारा जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांना शिवसेनेची उमेदवारी द्यावी, अशी थेट मागणी पश्चिम महाराष्ट्रातील शिवसैनिकांनी केली आहे. श्रीमंत संजीवराजे यांचा तळागाळातील दांडगा जनसंपर्क पाहता त्यांना विधान परिषदेवर संधी देण्याची भावना कार्यकर्त्यांकडून व्यक्त होत आहे.

श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांनी दीर्घकाळ तळागाळात काम करत सर्वसामान्यांच्या प्रश्नांशी बांधिलकी ठेवली आहे. सामान्यांच्या सुख-दुःखात सहभागी होणारा नेता म्हणून त्यांची ओळख निर्माण झाली आहे. त्यांच्या या प्रदीर्घ राजकीय अनुभवाचा फायदा शिवसेनेला निश्चित होऊ शकतो, असे मत शिवसैनिक मांडत आहेत. त्यामुळे शिवसेनेला मिळणाऱ्या जागेसाठी साताऱ्यासह पश्चिम महाराष्ट्रातून श्रीमंत संजीवराजे यांच्या नावाचा गांभीर्याने विचार व्हावा, असा आग्रह धरला जात आहे.

महाराष्ट्र विधान परिषदेच्या रिक्त होणाऱ्या ९ जागांसाठी केंद्रीय निवडणूक आयोगाने निवडणूक कार्यक्रम जाहीर केला आहे. २३ एप्रिलपासून उमेदवारी अर्ज दाखल करण्यास सुरुवात होणार असून ३० एप्रिल ही अंतिम तारीख आहे. २ मे रोजी अर्जांची छाननी होईल, तर ४ मे ही अर्ज मागे घेण्याची अंतिम मुदत असेल. १२ मे रोजी सकाळी ९ ते सायंकाळी ४ या वेळेत मतदान होऊन त्याच दिवशी सायंकाळी ५ वाजता मतमोजणी होणार आहे. संबंधित ९ आमदारांचा कार्यकाळ १३ मे रोजी संपत असल्याने ही निवडणूक होत आहे.

विधानसभेतील संख्याबळानुसार ९ पैकी सुमारे ५ जागा भाजप, २ जागा एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला, १ जागा राष्ट्रवादी (अजित पवार गट) आणि महाविकास आघाडीतील तिन्ही पक्षांना मिळून १ जागा मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. या पार्श्वभूमीवर शिवसेनेच्या वाट्याला येणाऱ्या जागांपैकी एक जागा निंबाळकर यांना द्यावी, अशी मागणी आता अधिक तीव्र होत आहे. आता पक्ष नेतृत्व यावर काय निर्णय घेणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.


Back to top button
Don`t copy text!