स्वाभिमानीचा सातार्‍यातील आक्रोश मोर्चा रद्द; 5 डिसेंबरच्या बैठकीत निर्णय न झाल्यास हातात दांडके घेण्याचा राजू शेट्टींचा इशारा

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

स्थैर्य, सातारा, दि.२३: कोरोना संक्रमणाची वाढती भीती व पदवीधर शिक्षक मतदार संघाच्या आचार संहितेचे कारण देत पोलीस प्रशासनाने कठोर भूमिका घेतल्याने स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा सातारा ते कराड पायी आक्रोश मोर्चा रद्द करण्यात आला. तथापि, 5 डिसेंबरला यासंदर्भात बैठक लावण्याचे आश्‍वासन प्रशासनाने दिले. या बैठकीत एकरकमी एफआरपी व दोनशे रुपये उचल याबाबत निर्णय न झाल्यास शेतकरी दांडके हातात घेवून रणांगणात उतरेल, असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष माजी खासदार राजू शेट्टी यांनी दिला.

गोव्याच्या समुद्र किना-यावर घातक जेलीफिशचा कहर 

शेतकर्‍यांच्या मागण्यांसाठी दि 23 ते 25 दरम्यान सातारा ते कराड आक्रोश मोर्चा काढण्याचा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने देण्यात आला होता. मोर्चाची संभाव्यता लक्षात घेता पोलीस अधीक्षक अजयकुमार बन्सल यांच्या आदेशाप्रमाणे सहाय्यक पोलीस अधीक्षक आँचल दलाल यांच्या नेतृत्वा अंर्तगत जय्यत पोलीस बंदोबस्त पोवई नाक्यावरील शिव पुतळ्या जवळ तैनात करण्यात आला होता. छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याजवळ स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष राजू शेळके यांच्या नेतृत्वाखाली मोर्चा साठी आंदोलक सज्ज झाले होते. दुपारी सव्वाबाराच्या दरम्यान माजी खासदार राजू शेट्टी यांचे पोवई नाक्यावर आगमन झाले. शेट्टी यांनी शिव पुतळ्याला हार अर्पण केला तेव्हा आंदोलकांनी जोरदार घोषणा केल्या. मोर्चा जेव्हा राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाअंतर्गत जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रवेशद्वारावर पोहचला तेव्हा जिल्हा प्रशासनाने पोलीसांच्या मार्फत लेखी पत्र राजू शेट्टी यांच्या स्वाधीन केले. शिक्षक व पदवीधर मतदार संघाची सातारा जिल्ह्यात लागू असलेली आचारसंहिता व कोविडचे वाढते संक्रमण यामुळे पोवई नाका सातारा ते प्रीतीसंगम कराड या दरम्यान काढण्यात येणारा शेतकर्‍यांचा आक्रोश मोर्चा रद्द करण्यात यावा, अशी विनंती जिल्हा प्रशासनाच्या वतीने करण्यात आली. तसेच स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या मागण्यांच्या अनुषंगाने 5 डिसेंबर रोजी नियोजन भवन येथे सकाळी अकरा वाजता बैठक घेण्याचे लेखी आश्‍वासन जिल्हाधिकारी शेखरसिंह यांनी दिल्याने राजू शेट्टी यांनी सातारा ते कराड आपोजित पायी मोर्चा रद्द केला

दरम्यान, सांगली व कोल्हापूर जिल्ह्यातील 55 साखर कारखानदारांनी एफआरपी प्रमाणे एकरकमी दर व उचल दोनशे रुपये या ऑनलाईन उस परिषदेतील मागण्यांना चांगला प्रतिसाद दिला. सातारा जिल्ह्यात मात्र अजूनही शेतकरी साखर सम्राटांच्या दबावाखाली आहे. जिल्हाधिकार्‍यांच्या विनंतीला मान देऊन आम्ही पायी मोर्चा स्थगित केला. मात्र, जिल्हाधिकार्‍यांच्या बैठकीत निर्णय न झाल्यास शेतकरी हातात दांडके घेतल्याशिवाय राहणार नाही. 2013 रोजी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने न भूतो न भविष्यती असा मोर्चा काढला होता. शेतकर्‍यांच्या मागण्या मान्य न झाल्यास पुन्हा मोठे आंदोलन उभे करण्यात येईल, मात्र त्या आंदोलनाची रणभूमी कराड असेल असा इशारा राजू शेट्टी यांनी दिला.

मंदिरांमध्ये गर्दीवर नियंत्रण मिळवण्यासाठी नवे नियम


प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Don`t copy text!