
थेट WhatsApp वर मिळवा
नवी मुंबईतील झोपडपट्ट्यांमध्ये वंचित समुदायांना पाण्याचा हक्क मिळवून देण्यासाठी आणि शाश्वत पाणीपुरवठा व्यवस्था सक्षम करण्यासाठी गिरवीच्या ॲड. सुजित निकाळजे यांनी तयार केलेल्या केस स्टडीची आंतरराष्ट्रीय स्तरावर दखल घेतली असून जकार्ता येथे त्यांचे कौतुक झाले आहे.
स्थैर्य, गिरवी, दि. ०५ नोव्हेंबर : नवी मुंबईतील झोपडपट्ट्यांमध्ये राहणाऱ्या वंचित समुदायांना पाण्याचा हक्क मिळवून देण्यासाठी आणि शाश्वत पाणीपुरवठा व्यवस्था सक्षम करण्यासाठी केलेल्या अभ्यासपूर्ण कार्याची आंतरराष्ट्रीय स्तरावर दखल घेण्यात आली आहे. गिरवी गावचे सुपुत्र ॲड. सुजित निकाळजे यांनी तयार केलेल्या केस स्टडीचा पाचव्या आंतरराष्ट्रीय शाश्वत विकास धोरण पुरस्कार २०२६ च्या अंतिम सात केस स्टडींमध्ये समावेश झाला आहे. विशेष म्हणजे, या पुरस्काराच्या अंतिम यादीत स्थान मिळवणारी भारतातील ही एकमेव केस स्टडी ठरली आहे.
आंतरराष्ट्रीय स्तरावर निवड
सिटीनेट आणि त्यांच्या सहयोगी आंतरराष्ट्रीय संस्थांच्या वतीने दरवर्षी शहरांमध्ये शाश्वत विकासासाठी उल्लेखनीय कार्य करणाऱ्या संस्था व शहरांच्या उपक्रमांना प्रोत्साहन देण्यासाठी हे पुरस्कार प्रदान केले जातात. यंदा या पुरस्कारासाठी जगभरातून शंभराहून अधिक केस स्टडी सादर करण्यात आल्या होत्या. त्यातून अंतिम फेरीसाठी केवळ सात केस स्टडींची निवड करण्यात आली. यामध्ये नवी मुंबईतील झोपडपट्ट्यांमध्ये पाणी उपलब्धतेचा हक्क आणि शाश्वत पाणीपुरवठा सक्षम करणे या विषयावरील निकाळजे यांच्या केस स्टडीचा समावेश झाला.
झोपडपट्ट्यांमधील पाणीपुरवठ्यावर अभ्यास
युवा (Youth for Unity and Voluntary Action) या संस्थेच्या माध्यमातून नवी मुंबईमध्ये सुरू असलेल्या कामाचा, विशेषतः झोपडपट्ट्यांमधील नागरिकांना पाण्याचा समान आणि न्याय्य हक्क मिळावा यासाठी राबविण्यात येत असलेल्या सर्वांसाठी पाणी या धोरणाचा या केस स्टडीमध्ये अभ्यासपूर्ण आढावा घेण्यात आला आहे. शहरी भागातील वंचित समुदायांच्या पाणीविषयक समस्या, त्यांच्या हक्कांसाठी सुरू असलेले प्रयत्न आणि शाश्वत पाणीपुरवठ्याच्या दृष्टीने आवश्यक असलेल्या उपाययोजना यांचे प्रभावीपणे सादरीकरण करण्यात आले आहे.
जकार्ता येथे पुरस्कार सोहळा संपन्न
गेल्या महिन्यात इंडोनेशियातील जकार्ता येथे या पुरस्काराचा सोहळा पार पडला. या कार्यक्रमात अंतिम फेरीतील विविध देशांमधील संस्था आणि प्रतिनिधी सहभागी झाले होते. यावेळी आयोजित खुल्या चर्चासत्रात विविध शहरांमधील चांगल्या कार्यपद्धती, अनुभव आणि शाश्वत शहरी विकासाच्या संकल्पनांवर विचारांची देवाणघेवाण झाली. या आंतरराष्ट्रीय व्यासपीठावर नवी मुंबईतील कामाची मांडणी करण्यासाठी निकाळजे यांची निवड झाली होती.





