
थेट WhatsApp वर मिळवा
दुधेबावी ग्रामविकास प्रतिष्ठानच्या वतीने आयोजित २६ व्या दुधेबावी फेस्टिव्हल आणि संत गाडगेबाबा व्याख्यानमालेचा शुभारंभ उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती अनिल पानसरे यांच्या हस्ते झाला.
स्थैर्य, फलटण, दि. ०६ नोव्हेंबर : दुधेबावी (ता. फलटण) येथे दुधेबावी ग्रामविकास प्रतिष्ठानच्या वतीने आयोजित सलग २६ व्या दुधेबावी फेस्टिव्हल आणि संत गाडगेबाबा व्याख्यानमालेचा उद्घाटन सोहळा आज उत्साहात पार पडला. उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती अनिल पानसरे यांच्या प्रमुख उपस्थितीत आणि सातारा जिल्हाधिकारी संतोष पाटील यांच्या अध्यक्षतेखाली हा सोहळा संपन्न झाला.
दिग्गजांची उपस्थिती आणि पुरस्कार प्रदान
या उद्घाटन सोहळ्याप्रसंगी प्रशासकीय व वनव्यवस्थापन विभागाचे अधिकारी हरिश्चंद्र वाघमोडे, चंदुकाका सराफ प्रायव्हेट लिमिटेडचे चेअरमन किशोरकुमार शहा यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. महोत्सवाच्या निमित्ताने आयोजित कार्यक्रमात सामाजिक, शैक्षणिक आणि प्रशासकीय क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. यामध्ये चंदुकाका सराफ प्रायव्हेट लिमिटेडचे चेअरमन किशोरकुमार शहा यांना राज्यस्तरीय उद्योगरत्न पुरस्काराने, तर सातारा जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल गावडे यांना राज्यस्तरीय प्रशासनरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
व्याख्यानमाला आणि विविध सांस्कृतिक उपक्रम
येत्या १० नोव्हेंबरपर्यंत चालणाऱ्या या फेस्टिव्हलमध्ये दररोज सायंकाळी ७ वाजता संत गाडगेबाबा व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात आले आहे. तसेच पहिल्या दिवशी उद्घाटनानिमित्त ‘खेळ रंगला पैठणीचा’ हा विशेष कार्यक्रम पार पडला. या महोत्सवात परिसरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन प्रतिष्ठानच्या वतीने करण्यात आले आहे.





