
थेट WhatsApp वर मिळवा
राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेमार्फत जाहीर करण्यात आलेल्या २०२६-२७ च्या राज्यस्तरीय ‘आयडॉल शिक्षक’ यादीत फलटण तालुक्यातील धुळदेव येथील उपशिक्षक सचिन अभंग यांनी स्थान पटकावले आहे.
स्थैर्य, विडणी, दि. ०४ नोव्हेंबर : राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेतर्फे (SCERT) शैक्षणिक वर्ष २०२६-२७ साठी जाहीर करण्यात आलेल्या प्रतिष्ठेच्या राज्यस्तरीय ‘आयडॉल शिक्षक’ यादीत फलटण तालुक्यातील श्रीमान शेठ धन्यकुमार रतनचंद गांधी विद्यालय, धुळदेव (रयत शिक्षण संस्था, सातारा) येथील उपशिक्षक सचिन भानुदास अभंग यांनी स्थान पटकावले आहे. त्यांच्या या निवडमुळे फलटण तालुक्याच्या शैक्षणिक वर्तुळात अभिमान व्यक्त होत आहे.
अध्यापनात तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर
अध्यापन क्षेत्रात चौदा वर्षांचा प्रदीर्घ अनुभव असलेले अभंग यांनी विद्यार्थ्यांमध्ये तार्किक विचारक्षमता वाढवण्यासाठी ‘बुद्धिमत्ता चाचणी सुलभ अध्यापन’ पद्धती विकसित केली आहे. तसेच स्पर्धा परीक्षा मार्गदर्शनात त्यांचे मोठे योगदान आहे. तंत्रज्ञानाचा सुयोग्य वापर करत त्यांनी अध्यापनात कृत्रिम बुद्धिमत्ता (AI Tools) चा अत्यंत प्रभावी वापर सुरू केला आहे. त्यांनी ‘SCERT’ साठी ई-कन्टेन्ट आणि ऍनिमेशन आधारित पाठ निर्मिती करून डिजिटल शिक्षणात स्वतःचा वेगळा ठसा उमटवला आहे. कोरोना काळात रयत शिक्षण संस्थेच्या ऑनलाईन शिक्षण प्रकल्पात सक्रिय सहभाग घेत त्यांनी सातत्याने प्रयोगशील अध्ययन-अध्यापन पद्धती राबवली आहे.
मान્યवरांकडून कौतुक आणि अभिनंदन
शैक्षणिक कार्यासोबतच त्यांनी विविध उपक्रमांतून आपले सामाजिक दायित्वही नेहमीच जपले आहे. त्यांच्या याच चौफेर कामगिरीमुळे राज्य शासनाच्या कडक निकषांवर आधारित मूल्यांकनातून त्यांची ‘आयडॉल शिक्षक’ म्हणून निवड झाली आहे. त्यांच्या या बहुमानाबद्दल उपमुख्यमंत्री कार्यालयाचे अवर सचिव धीरज अभंग, रयत शिक्षण संस्था साताराचे पदाधिकारी, पंचायत समिती सदस्य सचिन अभंग, विडणीचे सरपंच सागर अभंग, धुळदेव हायस्कूलचे मुख्याध्यापक व्ही. ए. मोरे, सहकारी शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, शालेय व्यवस्थापन समिती आणि ग्रामस्थांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.





