दैनिक स्थैर्य | दि. 21 ऑगस्ट 2023 | फलटण | श्रीराम एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष सुभाषराव सूर्यवंशी – बेडके यांचे पुणे येथे उपचारादरम्यान निधन झाले. त्यांची अंत्ययात्रा फलटण येथून दि. 21 ऑगस्ट रोजी सायंकाळी 7 वाजून 30 मिनिटांनी वाजता राहत्याघरापासून निघेल.
पन्नास वर्षापूर्वी फलटण तालुक्यात शिक्षणाचा विस्तार म्हणावा तसा झाला नव्हता. बहुजन समाज शिक्षणापासून वंचित होता. अशा या शिक्षणापासून वंचित असलेल्या घटकाला शैक्षणिकदृष्ट्या सक्षम करण्याच्या ध्येयाने, साक्षर करण्याचे हेतुने कै.कर्मवीर आण्णांच्या प्रेरणेने आणि कै.यशवंतराव चव्हाण यांच्या आशीर्वादाने सुभाषकाकांच्या वडिलांनी, कै.नामदेवराव बेडके तथा नानांनी या खडतर काळात आपल्या सहकार्यांच्या मदतीने श्रीराम एज्युकेशन संस्थेची मुहूर्तमेढ रोवली. त्याकाळी म्हणजे 50 वर्षांपूर्वी शाळा काढणे एक धाडसत होते. कैै.नानांनी काढलेल्या शाळांचा प्रचार आणि विस्तार करणे ही गोष्ट महाकठिण होती. अशा वेळी योगायोगाने शैक्षणिक क्षेत्रात प्रविष्ठ झालेल्या सुभाषकाकांनी, ध्येयाचा मेरुमणि बनून, शैक्षणिक प्रचाराची, विस्ताराची तालुकाभर वाढ करण्याचे ध्येय निश्चित केले. आणि अगदि आजअखेर त्यांनी या ध्येयाचा पाठपुरावा करुन ते तडीस नेलेले फलटणकरांनी पहिले आहे.
सुभाषकाकांच्या या अफाट कार्यामुळे श्रीराम एज्युकेशन सोसायटीचा एक अविभाज्य भाग म्हणजे सुभाषकाका असे समीकरण झाले आहे. त्यांनी शैक्षणिक क्षेत्रात काम करण्यास सुरुवात केली त्यावेळी समाजातील तळागाळांतल्या वंचितांच्या शिक्षणासाठी फारशा सोई उपलब्ध नव्हत्या. अशावेळी समाजासाठी काहीतरी करण्याच्या भावनेतून त्यांनी आपल्या शैक्षणिक संस्थेच्या सर्व शाखांचा विस्तार केला. कोणाचेही आर्थिक पाठबळ नसताना पण सामान्यांचा जनाधारावर त्यांनी हे अलौकिक कार्य पार पाडले. श्रीराम एज्युकेशन संस्थेची संस्थात्मक (संख्यात्मक) व गुणात्मक वाढ सुभाषकाकांनी केली. शिक्षणाने समाजात परिवर्तन होते, माणूस विचारशील बनतो त्यामुळे शिक्षणाला पर्याय नाही या विचारावर ते ठाम होते. शिक्षणासह मूल्यविचारांबाबत त्यांनी कधीच तडजोड केली नाही. त्यामुळे श्रीराम एज्युकेशन सोसायटीच्या सर्व शाखा आजही बदलत्या काळाबरोबर नेहमीच प्रगतशील आणि ज्ञानाबद्दल अद्ययावत राहिल्या आहेत.