दैनिक स्थैर्य | दि. २१ ऑगस्ट २०२३ | सातारा |
एकीव (ता. जावळी) येथे ‘श्रावणधारा’ कवी संमेलन आयोजित करण्यात आले होते. सारसत्वांची मांदियाळी कवितांच्या वर्षावात चिंब भिजून अक्षरश: कविता धबधब्यांसारख्या वाहिल्या.
प्रमुख पाहुण्यांकडून दीप प्रज्ज्वलित करण्यात आले. कवीसंमेलन अध्यक्षपदी ‘तुझा वेडा’ फेम युवा कवी अविनाश चव्हाण होते. अंगणवाडी एकीव, मोळेश्वर, कुसुंबी मुरा सेविका व मदतनीस यांचा कार्यक्रमात सन्मान करण्यात आला. आशाताई ज्योती कदम यांचाही उत्तम सहकार्य म्हणून सन्मान करण्यात आला.
कवी संमेलनाची सुरूवात प्रथम एकीव शाळेचा बालकवी आयुश कदम याने ‘तिरंगा’ ही कविता सादर करून केली. बहारदार रंगत प्रमुख पाहुणे म्हणून ज्यांची ख्याती आहे असे ‘तुझा वेडा’ गुगल फेम युवा कवी श्री. अविनाश चव्हाण यांनी आपल्या ‘तुझा वेडा’ आणि ‘बुट्टी’ या कवितांमधून रसिकांची मने जिंकली. ज्येष्ठ कवी श्री. विलास पिसाळ (वाई) यांनी ‘कोकण राजा’ या कवितेत नारळाचे खुमासदार शैलीत वर्ण केले. शब्दसम्राज्ञी सौ. जयश्रीताई माजगावकर यांनी सूत्रनिवेदन करत आपल्या रचना ‘पाउस आणि बाळ’, ‘धनी तुम्ही दारू सोडल्यापासून..’, ‘नजर तुझ्याशी..ट’ अशा कविता सादर केल्या.
श्री. प्रताप महांगडे यांनी ‘सध्याचे राजकारण’, ‘छत्रपती शिवराय म्हणायचे’, अशा सामाजिक रचना सादर केल्या. के. सागर (वाई) यांनी ‘छूमछूम पैंजण’ ही संकल्पनाच आपल्या कवितेत साकार केली.
पाचवड येथील कवयित्री अर्चना सुतार यांनी ‘तुला पाहिले की’, ‘किती झकास वाटतं’, या प्रेमकविता छान गाऊन वाहवा मिळवली. सौ. अनिता जाधव यांनी ‘सखे चेहरा तुझा मोगर्यासारखा’ ही स्त्रीसौंदर्य सांगणारी कविता वाचन केली.
अध्यक्षीय भाषणात युवा कवी म्हणाले की, साहित्यिक राजकारणात गेले तरी चालतील, मात्र साहित्यात राजकारण आणू नये. तसेच जावळी आजही दुर्गम परिसर असून कवींनी इथल्या समस्या आपल्या कवितेतून समाजापुढे मांडाव्यात.
या कवी संमेलनास बहुसंख्येने श्रोते उपस्थित होते.