उपसरपंचांचा बंद बंगला फोडला; दोन लाखाचा ऐवज लंपास


स्थैर्य, लोणंद, दि. ४: बंद बंगल्याच्या बेडरूमच्या दाराची कडी, कोयंडा व कुलूप कटावणीने तोडून अनाधिकृतपणे खोलीत प्रवेश करून कपाटातील सोन्याचे दागिणे व रोकड असा एकूण 2 लाख 7 हजार रुपये किंमतीचा  मुद्देमाल अज्ञात चोरट्यांनी चोरून नेला आहे.

ही घटना काल ( ता. 2) रात्री 11 ते पहाटे पाच वाजण्याच्या सुमारास आदर्की बुद्रूक ( ता. फलटण) येथे  घडली आहे.याबाबत लोणंद पोलिस ठाण्यातून मिळालेली अधिक माहिती अशी, आदर्की बुद्रूक येथील उपसरपंच असलेल्या सौ.राजकुंवर तुकाराम नलवडे व त्यांचे कुटूंबीय नेहमीप्रमाणे जेवण अटोपल्यावर 11 वाजण्याच्या सुमारास झोपी गेले.

दरम्यान, त्यांच्या बंगल्याच्या पाठीमागील पश्‍चिमेकडील बेडरुममध्ये कोणीही नव्हते. या खोलीच्या दक्षिणेकडील दरवाजाची कडी, कोयंडा व कुलूप कटावणीने तोडून खोलीत प्रवेश करुन खोलीतील गोदरेजच्या कपाटातील 47 ग्रॅम वजनाचा सुमारे 94 हजार रुपये किंमतीचा सोन्याचा मोठा पदक व पट्टी असलेला गंठण, दिड तोळा वजणाचे 30 हजार रुपये किंमतीचे सोन्याचे मिनी गंठण, अर्धा तोळा वजनाची 10 हजार रुपये किंमतीची सोन्याची अंगठी, चार हजार रुपये किंमतीची 2 ग्रॅम वजनाची कानातील सोन्याची बाळी, 3 ग्राम वजनाची सहा हजार रुपये किंमतीची सोन्याची लहान अंगठी, सात हजार रुपये किंमतीची सोन्याची कर्नफुले (गोळे) असा ऐवज व 56 हजाराची रोख रक्कम असा एकूण 2 लाख सात हजार रुपयांचा मुद्देमाल काल रात्री 11 ते पहाटे पाच वाजण्याच्या सुमारास अज्ञात चोरटयांनी चोरून नेला आहे.

याबाबत सौ.राजकुवर तुकाराम नलवडे (वय 48) रा. आदर्की बुद्रूक (ता. फलटण) जि. सातारा यांनी लोणंद पोलिस ठाण्यात फिर्याद दिली असून पोलिस उपनिरिक्षक गणेश माने हे अधिक तपास करत आहेत.


Back to top button
Don`t copy text!