साखरेचा गोडवा वाढवणाऱ्या ऊसतोड कामगारांसाठी शासनाचा मोठा निर्णय; कारखान्यांना कडक निर्देश

दैनिक स्थैर्य • WhatsApp Channel
सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या
थेट WhatsApp वर मिळवा
WhatsApp Channel JOIN करा ›

राज्यातील साखर कारखान्यांमध्ये कामासाठी येणाऱ्या ऊसतोड कामगारांना मूलभूत सुविधा पुरवणे आता कारखान्यांना बंधनकारक करण्यात आले असून, तसे न केल्यास कारवाईचा इशारा दिला आहे.

स्थैर्य, सातारा, दि. ०६ ऑक्टोबर : राज्यातील विविध भागांतून साखर कारखान्यांवर येणाऱ्या ऊसतोड कामगारांच्या हक्क आणि सुरक्षेसाठी राज्य सरकारने कडक पाऊल उचलले आहे. आगामी गाळप हंगामाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील सर्व साखर कारखान्यांनी ऊसतोड कामगार आणि त्यांच्या कुटुंबांसाठी आवश्यक त्या सर्व पायाभूत व आरोग्यदायी सुविधा पुरवाव्यात, असे स्पष्ट निर्देश कामगार विभागाने जारी केले आहेत. या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्या कारखान्यांवर कडक कायदेशीर कारवाई करण्याचा इशारा प्रशासनाकडून देण्यात आला आहे.

आरोग्य, पिण्याचे पाणी अन् राहण्याची सोय बंधनकारक

दरवर्षी लाखो ऊसतोड कामगार कुटुंबांसह ऊसतोडीच्या कामासाठी स्थलांतर करतात. मात्र, अनेक ठिकाणी त्यांना मूलभूत सुविधांशिवाय राहावे लागते. या परिस्थितीची गंभीर दखल घेत शासनाने कारखान्यांना कामगारांच्या वास्तव्याच्या ठिकाणी स्वच्छ पिण्याचे पाणी, तात्पुरती निवाऱ्याची सोय, वीज आणि स्वच्छतेची व्यवस्था उभारण्याचे आदेश दिले आहेत. तसेच कामगारांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी वैद्यकीय पथके आणि प्रथमोपचाराची सोय उपलब्ध करून देणे अनिवार्य केले आहे.

महिला अन् मुलांच्या सुरक्षेवर विशेष भर

ऊसतोड कामगारांच्या मुलांच्या शिक्षणात खंड पडू नये म्हणून कारखान्यांच्या परिसरात हंगामी शाळा किंवा पाळणाघरांची सोय करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. महिला कामगारांच्या सुरक्षिततेसाठी विशेष उपाययोजना आखण्याचे निर्देशही देण्यात आले आहेत. गोपीनाथ मुंडे ऊसतोड कामगार कल्याण महामंडळाच्या माध्यमातून या सर्व सुविधांच्या अंमलबजावणीवर आणि कामगारांच्या नोंदणीवर प्रत्यक्ष लक्ष ठेवले जाणार आहे.

 

हे देखील वाचा

Back to top button
कॉपी करू नका..!