
स्थैर्य, फलटण, दि. १२ : फलटणकरांचे आराध्य दैवत प्रभू श्रीराम मंदिरात सीतामाईचा संसार पाहण्यासाठी प्रतिवर्षी मकरसंक्राती दिवशी हजारो महिलांची झुंबड असते. परंतु ह्या वर्षी कोरोना म्हणजेच कोव्हीड १९ या विषाणूचा प्रादुर्भाव होऊ नये, या साठी मकरसंक्राती दिवशी फलटण येथील प्रभू श्रीराम मंदिर परिसरात संचार बंदीचे आदेश पारित करण्यात आलेले आहेत त्या मुळे रामवसा घेण्यासाठी महिलांनी गर्दी करू नये, असे आवाहन फलटणचे प्रांताधिकारी शिवाजीराव जगताप यांनी केलेले आहे.
फलटणच्या प्रभू श्रीराम मंदिरात गाडगी प्राचीन काळापासून श्री सीतामाई देवीचा संसार ठेवण्यात आलेला आहे. प्रतिवर्षी श्री सीतामाईचा संसार पाहण्यासाठी व रामवसा घेण्यासाठी येत असतात परंतु ह्या वर्षी कोरोना ह्या विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रभू श्रीराम मंदिर परिसरामध्ये रामवास घेण्यासाठी कोणीही येऊ नये. त्या ऐवजी आपापल्या घरातूनच प्रभू श्रीराम व सीतामाईला स्मरण करावे. ह्या वर्षी मकर संक्राती दिवशी श्रीराम मंदिर परिसरामध्ये कडक संचार बंदी घोषित केलेली आहे. जर कोणी प्रभू श्रीराम मंदिर येण्याचा प्रयत्न केला तर त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात येईल, असेही प्रांताधिकारी जगताप यांनी स्पष्ट केले.