
थेट WhatsApp वर मिळवा
लग्नसराईचा हंगाम जवळ येत असताना सोने आणि चांदीच्या किमतीत मोठी घसरण नोंदवण्यात आली असून, दागिने खरेदी करणाऱ्या ग्राहकांना मोठा दिलासा मिळाला आहे.
स्थैर्य,सातारा, दि. १४ नोव्हेंबर : सराफा बाजारात सोन्याच्या दरात प्रति १० ग्रॅममागे २ हजार २५० ते २ हजार ४५० रुपयांची, तर चांदीच्या दरात किलोमागे तब्बल ५ हजार रुपयांची घसरण झाली आहे. या ताज्या घसरणीनंतर पुण्यात २२ कॅरेट सोन्याचा प्रति १० ग्रॅमचा भाव १ लाख २५ हजार ८९० रुपयांवर, तर २४ कॅरेट सोन्याचा भाव १ लाख ३७ हजार ३४० रुपयांवर पोहोचला आहे. तसेच १८ कॅरेट सोन्याचा दर १ लाख ३ हजार रुपये नोंदवण्यात आला आहे.
चांदीचा भाव ५ हजारांनी कोसळला
सोन्यासोबतच चांदीच्या दरांमध्येही मोठी कपात पाहायला मिळाली आहे. चांदीचा भाव प्रति ग्रॅम १९९ रुपये ९० पैशांवरून घसरून १९४ रुपये ९० पैशांवर आला आहे. म्हणजेच एका किलोमागे चांदी तब्बल ५ हजार रुपयांनी स्वस्त होऊन १ लाख ९४ हजार ९०० रुपयांवर स्थिरावली आहे.
प्रमुख शहरांतील सोन्याचे ताजे दर
मुंबई, पुणे, नागपूर आणि बंगळुरू या शहरांमध्ये २२ कॅरेट सोन्याचा प्रति १० ग्रॅम दर १ लाख २५ हजार ८९० रुपये आणि २४ कॅरेट सोन्याचा दर १ लाख ३७ हजार ३४० रुपये आहे. नाशिकमध्ये २२ कॅरेट सोने १ लाख २५ हजार ९२० रुपये, तर २४ कॅरेट सोने १ लाख ३७ हजार ३७० रुपये दराने विकले जात आहे. दिल्लीत २२ कॅरेट सोन्यासाठी १ लाख २६ हजार ४० रुपये, तर चेन्नईमध्ये सर्वाधिक १ लाख २६ हजार ९४० रुपये मोजावे लागत आहेत.
खरेदी करताना कर आणि शुल्काची माहिती घ्या
वरील दरांमध्ये जीएसटी, टीसीएस आणि इतर कर तसेच दागिन्यांचे घडणावळ शुल्क समाविष्ट नाही. त्यामुळे प्रत्यक्ष दागिने खरेदी करताना ग्राहकांनी सोन्याची शुद्धता, हॉलमार्क आणि स्थानिक सराफाकडील अंतिम दराची खात्री करूनच व्यवहार करावा, असे आवाहन करण्यात आले आहे.





