एसटी कर्मचाऱ्यांच्या वेतनाबाबत मोठा निर्णय; दिवाळीपूर्वी पगार मिळण्याचे संकेत

दैनिक स्थैर्य • WhatsApp Channel
सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या
थेट WhatsApp वर मिळवा
WhatsApp Channel JOIN करा ›

राज्य मार्ग परिवहन महामंडळातील हजारो अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची दिवाळी गोड करण्यासाठी नोव्हेंबर महिन्याचे वेतन सणापूर्वीच अदा करण्यात यावे, असे निर्देश परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी एसटी प्रशासनाला दिले आहेत.

स्थैर्य, सातारा, दि. २५ ऑक्टोबर : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळातील (ST) सुमारे ८३ हजार अधिकारी व कर्मचाऱ्यांची दिवाळी गोड व्हावी, यासाठी नोव्हेंबर महिन्याचे वेतन दिवाळीपूर्वी अदा करण्याच्या दृष्टीने तातडीने कार्यवाही करावी, असे निर्देश परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी एसटी प्रशासनाला दिले आहेत. महामंडळातील कर्मचाऱ्यांचे वेतन सामान्यतः दर महिन्याला ७ ते १० तारखेदरम्यान होते. मात्र, यंदा ६ नोव्हेंबरपासून दिवाळी सणाला सुरुवात होत असल्याने कर्मचाऱ्यांना त्यापूर्वीच वेतन मिळणे आवश्यक आहे.

तातडीने पाठपुरावा करण्याचे आदेश

दिवाळीपूर्वी वेतन देण्यासाठी एसटी महामंडळाच्या अर्थ व नियोजन विभागाने तातडीने शासनाकडे पाठपुरावा करावा, असे निर्देश देण्यात आले आहेत. कर्मचाऱ्यांच्या वेतनासाठी आवश्यक असलेले अनुदान तसेच मागील महिन्यातील विविध प्रवासी सवलत योजनांच्या प्रतिपूर्तीपोटी शासनाकडून मिळणारी प्रलंबित रक्कम वेळेत उपलब्ध होण्यासाठी विशेष प्रयत्न करावेत, असे सरनाईक यांनी स्पष्ट केले आहे.

वेतन वितरणाचे नियोजन करण्याच्या सूचना

एसटी महामंडळाच्या आर्थिक अडचणींमुळे कर्मचाऱ्यांच्या सणाच्या आनंदावर विरजण पडू नये, यासाठी प्रशासनाने या विषयाला सर्वोच्च प्राधान्य द्यावे. शासनाकडून आवश्यक निधी उपलब्ध होण्यासाठी समन्वय साधून वेतन वितरणाचे नियोजन करावे आणि दिवाळीपूर्वी कर्मचाऱ्यांना पगार मिळेल, या दृष्टीने दक्षता घ्यावी, असे त्यांनी सांगितले. परिवहन मंत्र्यांच्या या निर्देशानंतर एसटी कर्मचाऱ्यांना दिलासा मिळाला असून, आता प्रशासनाकडून कशा प्रकारे कार्यवाही केली जाते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

 

 

हे देखील वाचा

Back to top button
कॉपी करू नका..!