
एसटी महामंडळाने प्रवाशांच्या सोयीसाठी ‘आपली एसटी’ हे डिजिटल ॲप सुरू केले असून यामुळे बसेसचे लाईव्ह लोकेशन आणि वेळापत्रक मोबाईलवर पाहता येणार आहे.
स्थैर्य, सातारा, दि. १० सप्टेंबर : महाराष्ट्राची जीवनवाहिनी असलेल्या एसटी महामंडळाने प्रवाशांना आधुनिक आणि डिजिटल सुविधा देण्यासाठी महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. एसटी बसेसच्या प्रवासाची अचूक माहिती मिळवण्यासाठी महामंडळाने ‘आपली एसटी’ (Apali ST) हे नवीन मोबाईल ॲप्लिकेशन विकसित केले आहे. या ॲपच्या माध्यमातून प्रवाशांना बसेसचे लाईव्ह लोकेशन, धावण्याची वेळ आणि स्थानकावरील आगमनाची अचूक माहिती थेट मोबाईलवर उपलब्ध होणार आहे.
बसेसचे लाईव्ह ट्रॅकिंग आणि वेळापत्रक एकाच क्लिकवर
नवीन ‘आपली एसटी’ ॲपमुळे प्रवाशांना बसस्थानकावर तासनतास ताटकळत राहावे लागणार नाही. महामंडळाने आपल्या बहुतांश बसेसमध्ये जीपीएस (GPS) प्रणाली बसवली असून त्याचे ट्रॅकिंग या ॲपशी जोडण्यात आले आहे. त्यामुळे कोणती बस कुठे पोहोचली आहे आणि ती इच्छित स्थानकावर कधी पोहोचेल, याची रिअल-टाईम माहिती प्रवाशांना मिळणार आहे. याशिवाय विविध मार्गांवरील बसेसचे वेळापत्रक आणि मार्ग पाहणे अधिक सुलभ झाले आहे.
प्रवाशांचा वेळ वाचणार अन् डिजिटल प्रवासाला गती
प्रवाशांना अधिक पारदर्शक आणि दर्जेदार सेवा देण्याच्या उद्देशाने एसटी महामंडळाने हे हायटेक पाऊल उचलले आहे. या तंत्रज्ञानामुळे ग्रामीण आणि शहरी भागातील लाखो प्रवाशांचा वेळ वाचण्यास मदत होणार आहे. प्रवाशांनी या डिजिटल रथाच्या सुविधेचा लाभ घेण्यासाठी ‘आपली एसटी’ ॲप मोबाईलमध्ये डाऊनलोड करावे, असे आवाहन एसटी प्रशासनाकडून करण्यात आले आहे.