क्रीडाक्षेत्र युवा पिढीसाठी करिअर घडवण्यासाठीचे महत्त्वाचे क्षेत्र – सुहास खामकर

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

दैनिक स्थैर्य | दि. १३ मे २०२३ | फलटण |
क्रीडाक्षेत्र हे एक युवा पिढीच्या दृष्टिकोनातून करिअर घडवण्यासाठीचे महत्त्वाचे क्षेत्र असून विद्यार्थ्यांनी महाविद्यालयीन जीवनामध्ये आपल्या ध्येयावर केंद्रित होऊन मेहनत घेतल्यास पुढील आयुष्य हे उज्ज्वल बनू शकते व आपल्या करिअरच्या माध्यमातून आपण राष्ट्राची, समाजाची सेवा करू शकतो, म्हणून विद्यार्थ्यांनी महाविद्यालयीन जीवनामध्ये व्यर्थ गोष्टींकडे दुर्लक्ष करून आपले ध्येय साध्य करावे, असे विचार प्रसिद्ध आंतरराष्ट्रीय बॉडीबिल्डर, ‘शिवछत्रपती पुरस्कार’ विजेते सुहास खामकर यांनी व्यत केले.

मुधोजी महाविद्यालयाच्या वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ समारंभामध्ये प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. यावेळी खामकर यांच्या हस्ते विद्यापीठस्तरीय, राज्यस्तरीय व राष्ट्रीय स्तरावरील खेळाडूंचा गुणगौरव करण्यात आला. त्याबरोबरच सांस्कृतिक विभागाच्या अनेक विद्यार्थ्यांनी राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय स्तरापर्यंत महाविद्यालयाचे नाव उज्ज्वल केल्याबद्दल गुणी कलाकारांचा यथोचित गौरव सुहास खामकर हस्ते करण्यात आला.

मुधोजी महाविद्यालयामध्ये क्रीडा विभागातील ८८, कलाविष्कार विभागातील ७० तर गुणवत्ताधारक ८० विद्यार्थी आणि एनसीसीच्या बेस्ट कॅडेट व बेस्ट फॅकल्टी बेस्ट स्टाफ बेस्ट डिपार्टमेंट अशा विविध बक्षिसांचे वितरण करण्यात आले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षपदी महाराष्ट्र खो-खो संघटनेचे विद्यमान अध्यक्ष श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर होते.

श्रीमंत संजीवराजे यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात विद्यार्थ्यांनी विविध क्षेत्रांमध्ये कामगिरी करत असताना आपल्यासमोर सुहास खामकर यांच्यासारख्या आदर्श व्यक्तिमत्त्वांना समोर ठेवून नियोजनबद्ध प्रयत्न केल्यास चांगले यश मिळू शकते. यशाचा कोणताही मार्ग सहज मिळत नसतो, मात्र जेव्हा यश मिळते तेव्हा सर्वच मार्ग राजमार्ग ठरतात. तेव्हा विद्यार्थ्यांनी आपल्या क्षेत्रामध्ये आदर्श कामगिरी करणार्‍या व्यक्तिमत्त्वांना समोर ठेवून प्रयत्न करावेत व उज्ज्वल यश संपादन करावे, असे सर्व बक्षीस पात्र विद्यार्थ्यांना आवाहन केले.

कार्यक्रमाच्या प्रारंभी महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ. पी. एच. कदम यांनी प्रास्ताविकामध्ये महाविद्यालयाने केलेल्या विविध क्षेत्रातील चौफेर कामगिरीचा आढावा घेतला. केवळ एकाच क्षेत्रात महाविद्यालयाला कामगिरी करून चालत नाही तर सर्वच क्षेत्रात नियोजनबद्ध कामगिरी केल्याशिवाय गुणवत्ता वाढू शकत नाही, त्यासाठी आम्ही शैक्षणिक वर्ष २०२२-२३ मध्ये चौफेर कामगिरी केल्याचे प्रतिपादन त्यांनी केले.

त्यानंतर प्रमुख अतिथींचा परिचय उपप्राचार्य डॉक्टर दीक्षित यांनी करताना अतिथी सुहास खामकर यांनी अल्पवयातच अनेक मोठी कामगिरी केल्याचे नमूद केले. सुरुवातीला मुख्यातिथी तसेच कार्यक्रमाचे अध्यक्ष व सर्व निमंत्रित मान्यवरांचे यथोचित स्वागत करण्यात आले. त्यानंतर क्रीडा विभाग कलाविष्कार विभाग व शैक्षणिक गुणवत्ता विभाग यांचा अहवाल व गुणवत्ता प्राप्त विद्यार्थ्यांचा सन्मान यांचे अहवालवाचन क्रीडा विभागप्रमुख डॉ. पाटील, श्री. शेंडगे, कलाविष्कार विभागप्रमुख प्रा.लक्ष्मीकांत बेडेकर व शैक्षणिक गुणवत्ता विभागाचे प्रमुख डॉक्टर टिके यांनी केले.

या कार्यक्रमाला ज्येष्ठ पत्रकार व महाविद्यालय विकास समितीचे सदस्य अरविंद मेहता, फ. ए.सो. चे. नियमक मंडळाचे सदस्य घोरपडे, शिरीष शेठ गांधी, पार्श्वनाथ राजवैद्य, अ‍ॅड. मिलिंद देशमुख, क्रीडाप्रेमी वेलणकर हे मान्यवर उपस्थित होते. त्याबरोबरच महाविद्यालयातील विद्यार्थी, प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचारी वृंद यांच्या उपस्थितीने सभागृह पूर्ण क्षमतेने भरलेले होते. समारोपप्रसंगी महाविद्यालय विकास समितीचे सदस्य डॉ. अशोक शिंदे यांनी सर्व मान्यवर व उपस्थित यांचे आभार व्यक्त केले.


Back to top button
Don`t copy text!