भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेअंतर्गत ६० कोटींचा निधी वितरित

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

दैनिक स्थैर्य । दि. १३ मे २०२३ । मुंबई । भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेअंतर्गत 60 कोटी रुपये इतका निधी शासनाकडून आज दिनांक 12 मे 2023 रोजी वितरीत करण्यात आलेला आहे. समाज कल्याण आयुक्तालयाकडून हा निधी अनुसूचित जाती व नवबौध्द विद्यार्थ्यांच्या आधार संलग्न बँक खात्‍यामध्ये लवकरच जमा करण्यात येणार आहे.

मागासवर्गीय मुलामुलींना उच्च ‍शिक्षण घणे सुकर व्हावे यासाठी राज्यात मागासवर्गीय मुलामुलींसाठी शासकीय वसतिगृहाची योजना राबविण्यात येते. राज्यात 441 ( मुले- 229 व मुली-212) शासकीय वसतिगृहे सुरू असून त्यामधून मोफत निवास, भोजन, शैक्षणिक साहित्य इ. सोयीसुविधा पुरविण्यात येतात.

सामाजिक न्याय विभागांतर्गत शासकीय वसतिगृहात प्रवेश घेण्यास पात्र असलेल्या परंतु शासकीय वसतिगृहात प्रवेश न मिळालेल्या अनुसूचित जाती व नवबौध्द विद्यार्थ्यांपैकी इयत्ता 11 वी व 12 वी तसेच यानंतरच्या व्यवसायिक तसेच बिगर व्यवसायिक अभ्यासक्रमामध्ये विविध स्तरावरील महाविद्यालयात/ शिक्षण संस्थांमध्ये प्रवेश मिळालेल्या विद्यार्थ्यांना भोजन,निवास, शैक्षणिक साहित्य, निर्वाह भत्ता उपलब्ध करून घेण्यासाठी भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना सुरू करण्यात आलेली आहे. या योजनेच्या माध्यमातून मुंबई शहर, मुंबई उपनगर, नवी मुंबई,ठाणे, पुणे, पिंपरी-चिंचवड, नागपूर या ठिकाणी उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना रू.60,000/- इतर महसुली विभाग शहरातील व उर्वरित क वर्ग महानगरपालिका क्षेत्रामध्ये उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी रू.51,000/- व इतर जिल्ह्याच्या ठिकाणी उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी रू.43,000/- इतकी रक्कम सबंधित विद्यार्थ्यांच्या आधार संलग्न बॅंक खात्यामध्ये जमा करण्यात येते.

या योजनेअंतर्गत सन 2022-23 या आर्थिक वर्षासाठी रू.126 कोटी इतका निधी वितरीत करण्यात आलेला आहे. सन 2023-24 या आर्थिक वर्षासाठी या योजनेअंतर्गत रू.150 कोटी इतकी तरतूद करण्यात आली असून त्यामधून यापूर्वी रू.15 कोटी इतका निधी वितरीत करण्यात आलेला आहे.आता रू.60 कोटी इतका निधी शासनाकडून दिनांक 12 मे,2023 रोजी वितरीत करण्यात आलेला आहे.


Back to top button
Don`t copy text!