दैनिक स्थैर्य । दि. १२ जून २०२३ । फलटण । फलटण तालुक्यामध्ये श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्याचे तीन मुक्काम असून फलटणला पालखी मुक्कामी असताना वारीमध्ये चोरट्यांवर वॉच ठेवण्यासाठी विशेष पथके तयार करण्यात आलेली आहेत. यांच्या माध्यमातून वारीमध्ये घडणारे अनुचित प्रकार रोखण्यासाठी नक्कीच मदत होईल; असा विश्वास फलटणचे पोलीस उपअधीक्षक राहुल धस यांनी व्यक्त केला.
श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्याच्या अनुषंगाने फलटण शहर पोलीस स्टेशन मध्ये शांतता कमिटीची बैठक बोलवण्यात आलेली होती. त्यावेळी पोलीस उपअधीक्षक राहुल धस बोलत होते. यावेळी फलटण शहर पोलीस स्टेशनचे निरीक्षक शंकर पाटील यांच्यासह शांतता कमिटीचे सदस्य उपस्थित होते.
श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्याच्या अनुषंगाने पालखी मार्गावर व पालखीतळावर यासोबतच मुक्कामाच्या ठिकाणी संपूर्ण शहरामध्ये पोलिसांची विशेष पथके सर्वसाधारण नागरिकांच्या विषयांमध्ये कार्यरत असणार आहेत. यासोबतच पालखी सोहळ्यामध्ये फिरते पोलीस स्टेशन सुद्धा कार्यरत राहणार आहे. फलटण येथील पालखीतळावर पोलीस मदत केंद्र सुद्धा उभारण्यात येत आहे. त्यामुळे आलेल्या वारकऱ्यांना व भाविकांना पोलीस प्रशासनाचे सर्वतोपरी सहकार्य राहणार आहे. कोणताही अनुचित प्रकार घडला तरी वारकरी व भाविकांनी तातडीने पोलीस विभागाशी संपर्क साधावा असे आवाहन धस यांनी केले आहे.
राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण, सार्वजनिक बांधकाम विभाग व फलटण नगर परिषद यांच्या माध्यमातून पालखी मार्ग सुस्थितीत करण्याचे काम सुरू आहे. गेल्या काही दिवसांपासून पालखी मार्गाची वारंवार पाहणी पोलीस प्रशासनाच्या सुद्धा माध्यमातून सुरू आहे. पालखी मार्गावर कोणत्याही ठिकाणी कसलीही अडचणी येऊ नये; याची विशेष खबरदारी पोलीस प्रशासन घेत असून पालखीच्या वेळी पर्यायी मार्ग सुद्धा वापरण्याचा निर्धार पोलीस प्रशासनाचा आहे; असेही यावेळी धस यांनी स्पष्ट केले.
प्रास्ताविक व आभार फलटण शहर पोलीस स्टेशनचे निरीक्षक शंकर पाटील यांनी मानले.