शिरवळ सरपंचावर 18 डिसेंबर रोजी अविश्‍वास प्रस्तावावरील विशेष ग्रामसभेचे आयोजनराजकीय उलथापालथीला आला वेग!


 


स्थैर्य, शिरवळ, ता. खंडाळा, दि.१५:  शिरवळ येथील ग्रामपंचायतीच्या थेट सरपंच लक्ष्मी पानसरे यांच्यावर ग्रामपंचायत सदस्यांनी मंजूर केलेला अविश्‍वास प्रस्तावावरील विशेष ग्रामसभेचे आयोजन शुक्रवार दि. 18 डिसेंबर रोजी सकाळी 10 वाजता ज्ञानसंवर्धिनी प्रशाला याठिकाणी करण्यात आले आहे. त्यामुळे राजकीय उलथापालथीला वेग आला आहे. शिरवळ सरपंच लक्ष्मी पानसरे यांना निवडून आणण्यात महत्वाची भूमिका बजावणारे शिरवळचे माजी सरपंच दशरथ निगडे यांनीही सरपंच लक्ष्मी पानसरे यांच्याशी कोणताही राजकीय संबंध नसल्याचे प्रसिद्धीपत्रक जाहीर केल्याने शिरवळ सरपंच लक्ष्मी पानसरे यांना व भाजपच्या गटाला जोरदार धक्कातंत्र बसला आहे. त्यामुळे शिरवळमधील राजकीय वातावरण तप्त बनले असून विविध चर्चेला उधाण आले आहे.

शिरवळ, ता. खंडाळा येथील थेट जनतेमधून 2017 साली झालेल्या सरपंचपदाच्या निवडणूकीमध्ये थेट सरपंचपदी भाजपप्रणित लक्ष्मी सागर पानसरे यांनी बाजी मारली होती.दरम्यान, शिरवळमध्ये राष्ट्रवादीची अवस्था निवडणूकी वेळेस गड आला पण सिंह गेला अशी झाली होती. यावेळी तत्कालीन भाजप शासनाने घेतलेल्या निर्णयामुळे तीन वर्ष लोकनियुक्त सरपंचावर अविश्‍वास प्रस्ताव दाखल करता येत नसल्याने राष्ट्रवादी काँग्रेसला मूग गिळून गप्प बसावे लागत असताना तीन वर्षामध्ये सरपंच लक्ष्मी पानसरे यांच्या गटाला रामराम ठोकत शिवसेनेच्या एका गटाचे व अपक्ष असे सहा सदस्य व राष्ट्रवादी काँग्रेसचे नऊ ग्रामपंचायत सदस्य असे 15 ग्रामपंचायत सदस्यांनी शिरवळ सरपंच लक्ष्मी पानसरे ह्या मनमानी कारभार करत असल्याचा आरोप करत खंडाळा तहसिलदार दशरथ काळे यांच्याकडे अविश्‍वास प्रस्ताव दाखल करीत16डिसेंबर2019रोजी 15 विरुध्द 3 मतांनी अविश्‍वास प्रस्ताव मंजूर केला होता. यावेळी सरपंच लक्ष्मी पानसरे यांनी अविश्‍वास प्रस्ताव मंजूरीविरोधात सातारा जिल्हाधिकारी यांच्याकडे अविश्‍वास प्रस्तावाविरोधात अपील दाखल केले होते.

 यावेळी सातारा जिल्हाधिकारी शेखर सिंह यांच्यासमोर सुनावणी होत सरपंच लक्ष्मी पानसरे यांनी दाखल केलेले अपील सातारा जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी फेटाळल्यानंतर शिरवळसह खंडाळा तालुक्यातील राजकीय वर्तृळात खळबळ उडाली आहे.

दरम्यान, सातारा जिल्ह्याच्या इतिहासामध्ये पहिल्यांदाच शिरवळ सरपंचाविरुध्द ग्रामसभेद्वारे निर्णय होणार असून ग्रामसभा घेण्याबाबतच्या कायदेशीर प्रक्रियेला प्रशासकीय स्तरावर वेग आला आहे. त्यामुळे शिरवळकरांच्या हातात सरपंच लक्ष्मी पानसरे यांचे भवितव्य अवलंबून असून सरपंचपदी शिरवळकर कायम ठेवणार की घालवणार यावर विविध चर्चेला उधाण आले आहे. तर भाजपबरोबर राष्ट्रवादी व शिवसेनेच्या एका गटाकडून जोरदार तयारी ग्रामसभेची सुरु करण्यात आली आहे.

 खंडाळा तहसीलदार दशरथ काळे यांच्या अध्यक्षतेखाली ज्ञानसंवर्धिनी प्रशाला शिरवळ येथे विशेष ग्रामसभेचे आयोजन करण्यात आले असून बहुसंख्येने मतदार विशेष ग्रामसभेस उपस्थित राहतील यासाठी जिल्हा परिषद अध्यक्ष उदय कबुले, खंडाळा पंचायत समिती सभापती राजेंद्र तांबे, शिरवळ उपसरपंच सुनील देशमुख, राष्ट्रवादी शहराध्यक्ष चंद्रकांत मगर, राष्ट्रवादी जिल्हा उपाध्यक्ष आदेश भापकर, शिवसेनेचे माजी तालुकाप्रमुख संपत मगर, संजय देशमुख, शिवसेना शहरप्रमुख विजय गिरे, काँग्रेसचे शहराध्यक्ष शिवाजी देशमुख, विलास असलेकर, रिपाईचे दादासाहेब कांबळे, यासह शिरवळ ग्रामपंचायतीचे 14 सदस्य यांनी अविश्‍वास प्रस्ताव मंजूरीकरिता एल्गार पुकारला आहे. भाजपकडून राज्य सरचिटणीस अनुप सूर्यवंशी, शिवसेनेचे माजी उपजिल्हाप्रमुख प्रदीप माने, आप्पासाहेब देशमुख, राजेंद्र मगर आदींनी अविश्‍वास प्रस्ताव नामंजूर होण्याकरिता शिरवळ ग्रामस्थांच्या भेटी घेत प्रचाराची मोहीम जोरदारपणे राबवित प्रचाराचा धुरळा उडत आहे.

त्यामुळे शुक्रवार दि. 18 डिसेंबर रोजी सकाळी 10 वाजता प्रत्यक्षरित्या विशेष ग्रामसभेला सुरवात होत निर्णय काय होणार? याबाबत विविध चर्चा रंगू लागल्या आहे. 


प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Don`t copy text!