नगरपरिषद शाळांचा दर्जा उंचावण्यासाठी निधी कमी पडू देणार नाही: आमदार सचिन कांबळे-पाटील


सोनिया चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने दहावी-बारावीतील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार; नगरपरिषद शाळांमध्ये कॉम्प्युटरची सोय करणार: नगराध्यक्ष समशेरसिंह

स्थैर्य, फलटण, दि. २ जून : सोनिया चॅरिटेबल ट्रस्ट, फलटण यांच्या वतीने मंगळवार पेठेतील ‘बुद्ध बंगला’ (बुद्ध निवास) येथे इयत्ता दहावी व बारावीच्या परीक्षेत घवघवीत यश संपादन केलेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार व गुणगौरव सोहळा आज (मंगळवार, दि. २) मोठ्या उत्साहात पार पडला. यावेळी उपस्थित विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले.

मराठी शाळांचा दर्जा उंचावणार: आमदार सचिन कांबळे-पाटील

या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून बोलताना आमदार सचिन कांबळे-पाटील यांनी आयोजकांचे कौतुक केले. ते म्हणाले, “सनी अहिवळे व सुपर्णा अहिवळे यांचे शिक्षण क्षेत्रातील कार्य अत्यंत कौतुकास्पद आहे. गरजू विद्यार्थ्यांना आधार देण्याचे काम ते गेली दोन दशके निस्वार्थपणे करत आहेत. फलटण येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर नगरपरिषद शाळा क्रमांक २ च्या विकासासाठी निधीची कोणतीही कमतरता भासू देणार नाही. भविष्यात फलटणमधील मराठी शाळांचा शैक्षणिक दर्जा उंचावण्यासाठी आपण विशेष प्रयत्नशील राहू.”

शाळांमध्ये आधुनिक तंत्रज्ञान आणणार: नगराध्यक्ष समशेरसिंह

नगराध्यक्ष समशेरसिंह नाईक निंबाळकर यांनी मार्गदर्शन करताना सांगितले की, “फलटणच्या उज्ज्वल भविष्यासाठी सोनिया चॅरिटेबल ट्रस्टचे योगदान मोठे आहे. शिक्षणातूनच समाज परिवर्तन घडते, हे अहिवळे कुटुंबीयांनी दाखवून दिले आहे. माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या माध्यमातून आणि प्रयत्नातून फलटणच्या नगरपरिषद शाळांचा विकास साधला जाईल. विद्यार्थ्यांना आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करता यावा, यासाठी शाळांमध्ये कॉम्प्युटरची सोय उपलब्ध करून दिली जाईल.”

‘मिशन १०० डॉक्टर-इंजिनिअर’ राबवणार: सनी अहिवळे

सोनिया चॅरिटेबल ट्रस्टच्या माध्यमातून माजी नगरसेवक सनी अहिवळे व नगरसेविका सुपर्णा सनी अहिवळे हे गेली २२ वर्षे अविरतपणे हजारो गरीब, होतकरू व गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करून त्यांना दप्तर, वह्या व पुस्तके भेट देऊन प्रोत्साहन देत आहेत. यावेळी बोलताना सनी अहिवळे म्हणाले, “बुद्ध निवासच्या दारात आलेल्या एकाही विद्यार्थ्याला आम्ही आजवर रिकाम्या हाताने पाठवले नाही. भविष्यात ‘मिशन १०० डॉक्टर-इंजिनिअर’ सारखे उपक्रम राबवून ग्रामीण भागातील मुलांना मुख्य प्रवाहात आणण्याचा आमचा मानस आहे.”

मान्यवरांची उपस्थिती व सन्मान

या सोहळ्यास उपनगराध्यक्षा सौ. प्रियदर्शनी रणजित भोसले, विजय येवले, नगरसेवक सचिन अहिवळे, नगरसेविका मीना जीवन काकडे, सुदाम मांडरे, सिधाली अनुप शहा, बी. टी. जगताप यांच्यासह शहरातील सामाजिक, शैक्षणिक व राजकीय क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कार्यक्रमाची सुरुवात महामानवांच्या प्रतिमापूजनाने व दीपप्रज्वलनाने झाली. ‘झाडे लावा, झाडे जगवा’ या सामाजिक उपक्रमांतर्गत उपस्थित सर्व मान्यवरांचा सत्कार रोपटे व श्रीफळ देऊन करण्यात आला. या कार्यक्रमाचे उत्कृष्ट सूत्रसंचालन हरीश काकडे यांनी केले, तर आभार नगरसेविका सुपर्णा सनी अहिवळे यांनी मानले. याप्रसंगी विद्यार्थी, पालक व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.


Back to top button
Don`t copy text!