
थेट WhatsApp वर मिळवा
सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाकडून स्वतंत्र शेतकरी पॅनेल उभे करण्याची घोषणा युगेंद्र पवार यांनी केली आहे.
स्थैर्य, बारामती, दि. ०८ सप्टेंबर : बारामती तालुक्यातील प्रतिष्ठेच्या श्री सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीच्या रणधुमाळीत राजकीय घडामोडींना वेग आला आहे. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी निवडणूक बिनविरोध करण्याचे आणि एकजुटीचे केलेले आवाहन अवघ्या २४ तासांत धुडकावत युवा नेते युगेंद्र पवार यांनी स्वतंत्र ‘शेतकरी पॅनेल’ उभे करण्याची घोषणा केली आहे. त्यामुळे बारामतीत पुन्हा एकदा ‘पवार विरुद्ध पवार’ असा चुरशीचा सामना रंगण्याची चिन्हे स्पष्ट झाली आहेत.
शरद पवारांच्या मार्गदर्शनाखाली ‘शेतकरी पॅनेल’
बारामती येथे आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना युगेंद्र पवार यांनी पक्षाची अधिकृत भूमिका स्पष्ट केली. पुरंदर, बारामती, खंडाळा आणि फलटण तालुक्यातील सभासदांशी तसेच पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्याशी सविस्तर चर्चा करूनच हा निर्णय घेण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. या निवडणुकीत उच्चशिक्षित, तरुण आणि पारदर्शक कारभार करणाऱ्या नव्या चेहऱ्यांना संधी दिली जाणार असल्याचे त्यांनी नमूद केले.
सभासदांच्या हितासाठी निवडणुकीचा निर्णय
कारखान्याचा कारभार सुरळीत चालण्यासाठी शरद पवार यांनी लक्ष द्यावे, अशी सभासदांची तीव्र भावना असल्याचे युगेंद्र पवार यांनी स्पष्ट केले. ऊस उत्पादकांना योग्य दर मिळवून देणे, साखरेचा दर्जा सुधारणे आणि वेळेवर ऊसतोडीचे नियोजन करणे या प्रमुख मुद्द्यांवर ‘शेतकरी पॅनेल’ निवडणूक लढवणार आहे. या घोषणेमुळे बिनविरोध निवडणुकीची शक्यता मावळली असून सोमेश्वरच्या आखाड्यात राजकीय ईर्ष्या टोकाला पोहोचली आहे.





