स्थैर्य, चंद्रपूर, दि.३०: सामाजिक कार्यकर्त्या आणि महारोगी सेवा समितीच्या सीईओ डॉ. शीतल आमटे यांनी आनंदवन येथील राहत्या घरी विष प्राशन करून आत्महत्या केली. शीतल आमटे स्वर्गीय समाजसेवक बाबा आमटे यांच्या नात होत्या. मिळालेल्या माहितीनुसार, शीतल यांनी आनंदवन येथील राहत्या घरी विषाचे इंजेक्शन घेतल्याची माहिती समोर येत आहे. त्यानंतर त्यांना तातडीने वरोरा येथील उपजिल्हा रुग्णालयात हलवण्यात आले. मात्र डॉक्टरांनी त्यांना तपासून मृत घोषित केले.
शीतल आमटे या बाबा आमटे यांची नात आणि विकास आमटे यांची कन्या आहे. संपूर्ण आनंदवनाची जबाबदारी शीतल आमटे यांच्यावर होती. बाबा आमटेंच्या तिसऱ्या पिढीचे त्या नेतृत्व करत होत्या. शीतल आमटे काही दिवसांपासून मानसिक तणावात होत्या, त्यातूनच त्यांनी आत्महत्या केल्याचे बोलले जात आहे.
मागील काही महिन्यांपासून आमटे परिवारात अंतर्गत वाद पेटला होता. हा वाद अनेकदा चव्हाट्यावर आला. शीतल यांच्यामुळे वाद होत असल्याचा आरोप वेळोवेळी झाला. हा अंतर्गत गृहकलह सुरू असतानाच आज त्यांच्या आत्महत्येची बातमी समोर आली आहे. कुष्ठरोग्यांच्या आयुष्यात आनंद देणाऱ्या आनंदवनमध्येच ही धक्कादायक घटना घडल्याने सामाजिक वर्तुळ हादरले आहे.