श्रीराम कारखाना वाचवा, अन्यथा तीव्र आंदोलन; स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा इशारा

श्रीराम साखर कारखान्याचे राजकारण थांबवून तो त्वरित सुरू करावा, अन्यथा रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन छेडू, असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेने दिला आहे.

स्थैर्य, फलटण, दि. २७ जून : फलटण तालुक्यातील श्रीराम सहकारी साखर कारखान्याच्या भवितव्याबाबत सुरू असलेल्या राजकीय घडामोडींवर स्वाभिमानी शेतकरी संघटनेने तीव्र संताप व्यक्त केला आहे. दोन्ही गटांनी आरोप-प्रत्यारोपांचे राजकारण थांबवून कारखाना सक्षमपणे चालवावा, अन्यथा तीव्र लोकआंदोलन उभारण्यात येईल, असा इशारा संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी दिला आहे.

श्रीराम कारखाना १५ वर्षांसाठी भाडेतत्त्वावर देऊनही त्यावर मोठ्या प्रमाणात कर्ज शिल्लक आहे. कारखाना चालविणे शक्य नसल्याचे सांगितले जात असताना, या परिस्थितीस जबाबदार कोण, असा थेट सवाल स्वाभिमानी शेतकरी संघटनेने उपस्थित केला आहे. कारखाना जाणीवपूर्वक अडचणीत आणायचा, तोटा दाखवायचा आणि नंतर खाजगी क्षेत्राकडे वळवायचा, हा प्रकार सहकार चळवळीसाठी अत्यंत घातक असल्याचे संघटनेने स्पष्ट केले आहे.

हजारो शेतकऱ्यांचे नुकसान अटळ

हा कारखाना कोणत्याही एका राजकीय गटाचा नसून तो हजारो शेतकरी, कामगार आणि ऊस उत्पादकांच्या घामातून उभा राहिला आहे. कारखाना बंद पडल्यास हजारो टन ऊस इतर कारखान्यांकडे वळेल, स्थानिक रोजगार धोक्यात येतील आणि परिसरातील अर्थव्यवस्थेचे मोठे नुकसान होईल. त्यामुळे कारखाना बंद ठेवण्याचा किंवा दुर्लक्षित करण्याचा कोणताही प्रयत्न खपवून घेतला जाणार नाही, अशी ठाम भूमिका संघटनेने मांडली आहे.

सत्तेत असलेल्या नेत्यांनी आपल्या अधिकाराचा वापर सहकारी संस्था बळकट करण्यासाठी करावा. कारखान्याच्या अस्तित्वावर घाला घालणारा कोणताही निर्णय घेतल्यास रस्त्यावर उतरून लढा दिला जाईल, असे यावेळी सांगण्यात आले. या बैठकीस स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे सातारा जिल्हाध्यक्ष धनंजय महामुलकर, युवक राज्य प्रवक्ते प्रमोद गाडे, फलटण तालुकाध्यक्ष नितीन यादव, जिल्हा सरचिटणीस रवींद्र घाडगे, साखरवाडी विभाग प्रमुख किरण भोसले, किसनराव शिंदे आणि बाळासाहेब शिपुकले उपस्थित होते.

Back to top button
Don`t copy text!