ना.श्रीमंत रामराजेंची विजयाची हॅट्रीक; महाराष्ट्र विधान परिषद निवडणूकीचा निकाल जाहीर


दैनिक स्थैर्य । दि. २० जुन २०२२ । मुंबई । प्रसन्न रूद्रभटे । महाराष्ट्र विधान परिषद निवडणूकीत विधान परिषदेचे सभापती ना.श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर राष्ट्रवादी काँग्रेसकडून सलग तिसर्‍यांदा विजयी झाले असून या निकालामुळे राज्याच्या राजकारणातील ना.श्रीमंत रामराजे यांचा करिष्मा पुन्हा एकदा सिद्ध झाला आहे. या निकालामुळे ना.श्रीमंत रामराजे यांची सन 1991 पासूनची सलग 31 वर्षांची यशस्वी राजकीय घोडदौड आणखीन पुढील 6 वर्षांसाठी सुनिश्‍चित झाली आहे. दरम्यान, या निकालामुळे फलटणसह सातारा जिल्ह्यात कार्यकर्त्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.

विधानपरिषदेच्या द्विवार्षिक निवडणूकीत ना. श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांनी २८ मते मिळवुन विजयाची मोहर उमटवली आहे. ना. श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांचा राज्यात असणारा दबदबा पुन्हा एकदा दिसुन आला आहे. आज झालेल्या मतदानात व त्यांनतर करण्यात आलेल्या मतमोजणीमध्ये ना. श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांना २८ मते मिळाली आहेत व ना. श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर हे विजयी म्हणून घोषित करण्यात आले आहेत.

राज्यपातळीवरील राजकारणात सुरुवातीला सन 1995 पासून सन 2009 पर्यंत विधानसभेवर आमदार म्हणून सलग 15 वर्षे निवडून गेलेल्या ना.श्रीमंत रामराजे यांनी आता राष्ट्रवादी काँग्रेसकडून विधान परिषदेसाठी सलग तिसर्‍यांदा विजयी होण्याचा इतिहास घडवला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे सुप्रिमो खा.शरद पवार यांनी राज्यपातळीवर नेतृत्त्व करण्याची वारंवार दिलेली संधी ना.श्रीमंत रामराजेंचे राजकीय महत्त्व स्पष्ट करणारी आहे.

ना.श्रीमंत रामराजे हे 1995 नंतर राज्याच्या राजकारणात फलटणचे अपक्ष आमदार म्हणून निवडून आले. तेव्हापासून ते आजही फलटण, माण, खटाव, खंडाळा, उत्तर कोरेगाव या कायम दुष्काळी तालुक्याला पाणी मिळवून देण्यासाठी गेली सुमारे 30 वर्षे सातत्याने प्रयत्नशील राहिले आहेत. त्यामध्ये खा. शरदराव पवार यांचे मार्गदर्शन आणि ना. अजित पवार यांचे सहकार्य लाभल्यानेच दुष्काळी पट्ट्यातील शेतीच्या पाण्याचा प्रश्‍न अंतिम टप्प्यापर्यंत सोडविण्यात ते यशस्वी झाले आहेत.

1995 पासून दुष्काळी पट्ट्यातील शेतीच्या पाण्यासाठी काम करताना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने दिलेली संधी आणि सर्वसामान्य मतदारांनी दिलेला एकमुखी पाठींबा यामुळेच या प्रश्‍नासाठी प्रयत्न करू शकल्याची भावना कायम ठेवून केवळ पाटबंधारे प्रकल्पाचा प्रश्‍न अंतिम टप्प्यात आला म्हणून समाधान न मानता या प्रकल्पाच्या पूर्ततेसाठी आवश्यक असलेल्या निधीची उपलब्धता करून घेऊन या प्रकल्पाचे पाणी सर्वसामान्यांच्या शेतापर्यंत आणेपर्यंत तथापि त्यानंतरही या पाण्यातून पिकलेल्या शेतमालावर, फळबागावर प्रक्रिया करून या भागातील शेतकरी केवळ शेतकरी न राहता तो उद्योजकहीं बनला पाहिजे हा शरद पवार यांच्या विचारांचा पाठपुरावा करण्यात ते मागे राहिले नाहीत.

निरा – देवधर आणि धोम – बलकवडी हे दोन्ही पाटबंधारे प्रकल्प पूर्ण होऊन त्यामध्ये साठविण्यात आलेले पाणी कालव्याद्वारे दुष्काळी पट्ट्यातील शेतापर्यंत आणण्यासाठी ना. श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर खा. शरदराव पवार यांच्या मार्गदर्शनाखाली आणि राज्याचे उपमुख्यमंत्री ना. अजित पवार यांच्या सहकार्याने प्रयत्नशील राहिले असून धोम – बलकवडीचे पाणी खंडाळा आणि फलटण तालुक्यापर्यंत पोहोचविण्यात त्यांना यश आले आहे. फलटण तालुक्याचा विचार केला तर याच विकासकामांच्या जोरावर तालुक्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांवर ना.श्रीमंत रामराजे यांचे निर्विवाद वर्चस्व कायम राहिले आहे.

सन 2010 सालापासून ना.श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर विधान परिषद सदस्य म्हणून कार्यरत आहेत. यातील सर्वात लक्षणीय बाब म्हणजे गेली 7 वर्षे या सभागृहाचे ते सभापतीपदाचे सर्वोच्च पद मोठ्या कौशल्याने भूषवत आहेत. विशेष बाब म्हणजे या 7 वर्षातील सुमारे 4 वर्षे राष्ट्रवादी काँग्रेस सत्तेत देखील नव्हती. वि.स.पागे, जयंतराव टिळक, प्रा.ना.स.फरांदे अशा दिग्गजांची परंपरा लाभलेले हे विधान परिषदेचे सभापतीपद घटनात्मक चौकटीत राहून तितक्याच ताकदीने व कौशल्याने भूषविण्याचे कौशल्य ना.श्रीमंत रामराजे यांच्याकडे असल्यानेच हे शक्य झाले होते. आता नव्याने पुढील 6 वर्षांकरिता ना.श्रीमंत रामराजे यांची पुन्हा एकदा विधान परिषद सदस्यपदी निवड झाल्यानंतर सभापतीपदीही तेच कायम राहतील, असा स्पष्ट विश्‍वास राजकीय वर्तृळातून व्यक्त केला जात आहे.


Back to top button
Don`t copy text!