श्री दत्ता बाळ हे एक हिंदू धर्माचे प्रखर पुरस्कर्ते : डॉ. नवनाथ रासकर


दैनिक स्थैर्य । दि. २४ नोव्हेंबर २०२२ । फलटण । श्री दत्ता बाळ एक उपेक्षित तत्त्वज्ञ: कोल्हापूरच्या एका शिक्षित व सदन कुटुंबातील आध्यात्मिक दृष्ट्या संपन्न असणारे व जपान येथे झालेल्या आंतरराष्ट्रीय धर्म परिषदेमध्ये सहभागी झालेले श्री दत्ता बाळ हे एक हिंदू धर्माचे प्रखर पुरस्कर्ते होते परंतु एक उपेक्षित व्यक्तिमत्व असले तरी त्यांचे हिंदू धर्मविषयक कार्य अत्यंत मौल्यवान असल्याचे प्रतिपादन डॉ. नवनाथ रासकर तत्त्वज्ञान विभाग प्रमुख मुधोजी महाविद्यालय, फलटण यांनी केले.

मंगळवार दि. 22 नोव्हेंबर रोजी शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर व मुधोजी महाविद्यालय फलटण यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केलेल्या श्री दत्ता बाळ व्याख्यान माले अंतर्गत ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ. पी. एच कदम हे कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी होते.

महाविद्यालयातील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी वृंद यांनी या व्याख्यानाचा लाभ घेतला. श्रीदत्ता बाळ यांचे जीवन व तत्त्वज्ञान या विषयावर बोलताना डॉ. रासकर यांनी दत्ता बाळ यांचा कार्यकाळ स्वातंत्र्य नंतरचा असूनही ते प्रसिद्धी पराडमुख असल्याचे दिसून येते. त्यांनी हिंदू धर्माचे चिंतन करून स्वतःला पूर्णता धर्मचिकित्सेमध्ये वाहून घेतलेले दिसून येते त्यांचे वडील शिक्षण महर्षी एम आर देसाई हे होते.

एका सुशिक्षित आणि प्रतिष्ठित कुटुंबात जन्माला आलेले श्रीदत्ता बाळ हे आपल्या आध्यात्मिक प्रगतीसाठी सर्व ऐहीक सुखाचा त्याग करून स्वतःचा शोध घेत गेले ते खऱ्या अर्थाने योगी होते त्यांना १९४१ – १९८२ असे अवघे 40 वर्षाचे आयुष्य लाभले त्यांच्यावर स्वामी विवेकानंदांचा प्रभाव दिसून येतो त्यांनी हिंदू धर्माचे विश्लेषण प्रखरपणे केलेले दिसून येते त्यांनी आपल्या तत्त्वज्ञानामध्ये आद्य शंकराचार्य, विवेकानंद यांचा प्रामुख्याने ठळकपणे आढावा घेतल्याची दिसते. त्यांना महाराष्ट्राचे प्रती स्वामी विवेकानंद असे म्हटले जात असे. हिंदू धर्मातील तत्त्वांचा अभ्यास करून जपान येथे झालेल्या परिषदेमध्ये त्यांनी स्वामी विवेकानंदांनी जे कार्य शिकागो परिषदेत केले तेच कार्य जपानमध्ये केल्याचे दिसून येते. या परिषदेत प्रामुख्याने त्यांनी फाशीच्या शिक्षेच्या संदर्भात आपली भूमिका मांडून अस्पृश्यता ही हिंदू धर्मांतर्गत बाब नसून रूढीचा भाग आहे असे सांगितले, हे श्री दत्ता बाळांचे मत त्यांनी मांडले.

डॉ. रासकर यांनी आपल्या व्याख्यानामध्ये श्रीदत्ता बाळ यांचे जीवन व चरित्र सखोल पणे मांडले व दत्ता बाळ यांचे उपेक्षित चिंतन किती महत्त्वाचे आहे हे सर्व उपस्थितांना पटवून दिले. पुढे बोलताना डॉ रासकर यांनी त्यांचा विज्ञानाधिष्ठित अध्यात्मवाद विविध पैलूंसह मांडला, उत्क्रांतीवादाच्या त्यांच्या भूमिकेचाही आढावा घेतला. असे प्रचंड बुद्धिमत्ता लाभलेल्या आणि अंतर्ज्ञानी महायोग्याचे पर्यावरण विषयक विचारही आजच्या काळाला मार्गदीप ठरतील असेच आहेत.

हे लक्षात घेऊन या उपेक्षित व्यक्तिमत्त्वाला न्याय द्यायचा असेल तर श्री दत्ता बाळांचे दीर्घकाळ सानिध्य लाभलेले ज्येष्ठ तत्त्वचिंतक व पत्रकार डॉ. सुभाष देसाई यांनी पुढाकार घेऊन सुरू केलेल्या या व्याख्यान मालेच्या माध्यमातून त्यांच्या विचारांना चालना देता येईल, त्याबरोबरच शिवाजी विद्यापीठाने श्री दत्ता बाळ अध्यासन केंद्र सुरू करून त्यांचे चिंतन अधिक समाजाभिमुख करण्यासाठी संशोधन होणे गरजेचे आहे असे मत आग्रहाने मांडले.

अध्यक्ष स्थानावरून बोलताना प्रभारी प्राचार्य डॉ. कदम यांनी श्री दत्ता बाळ यांचे कार्य व चरित्र हे भारतीय तत्त्वज्ञानातील स्वातंत्र्योत्तर काळातील एक महत्त्वाचे व मार्गदीप ठरावे असे चिंतन असल्याचे मत व्यक्त करून शिवाजी विद्यापीठाच्या अशा व्याख्यानमाला या निश्चितच स्थानिक उपेक्षित तत्त्वज्ञांना न्याय देतील व त्यांचे कार्य समाजाच्या चौफेर विकासासाठी उपयुक्त ठरेल त्यासाठी शिक्षक वृंदांनी आपल्या संशोधनांमध्ये अशा उपेक्षित चिंतनाला समाजासमोर आणावे असे आवाहन करून ही व्याख्यानमाला उत्तरोत्तर शिवाजी विद्यापीठा च्या कार्यक्षेत्रात निश्चितच श्री दत्ता बाळ यांचे कार्य प्रसारित करेल अशी आशा व्यक्त केली.

या व्याख्यानाचे प्रास्ताविक उपप्राचार्य डॉ. एस.जी. दीक्षित यांनी केले कार्यक्रमाचे आभार डॉ. ए एस टीके यांनी तर सूत्रसंचालन प्रा. धुलगुडे यांनी केले.


Back to top button
Don`t copy text!