‘विकासकामांच्या दर्जाबाबत कोणतीही तडजोड करू नका’; मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांचे छत्रपती संभाजीनगरमध्ये अधिकाऱ्यांना सक्त निर्देश


राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांनी छत्रपती संभाजीनगर येथे PWD विभागाची आढावा बैठक घेत विकासकामे, रस्ते आणि इमारतींच्या गुणवत्तेबाबत अधिकाऱ्यांना कडक सूचना दिल्या आहेत.

स्थैर्य, छत्रपती संभाजीनगर , दि. १६ :  सार्वजनिक बांधकाम विभाग (PWD) हा राज्याच्या विकासामध्ये अत्यंत महत्त्वपूर्ण भूमिका बजावणारा विभाग आहे. या विभागामार्फत विविध शासकीय कार्यालये, इमारती, रस्ते व पूल आदी पायाभूत सुविधांची कामे केली जातात. त्यामुळे या कामांची गुणवत्ता व दर्जा याकडे कटाक्षाने लक्ष दिलेच पाहिजे. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात होणाऱ्या कोणत्याही विकासकामांच्या दर्जाबाबत तडजोड करू नका, अशा सक्त सूचना राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री श्रीमंत छ. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी अधिकाऱ्यांना दिल्या आहेत.

छत्रपती संभाजीनगर येथील शासकीय विश्रामगृहात मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या अध्यक्षतेखाली सार्वजनिक बांधकाम प्रादेशिक विभागाची महत्त्वपूर्ण आढावा बैठक पार पडली. यावेळी ते बोलत होते.

आढावा बैठकीस अधिकाऱ्यांची उपस्थिती

या बैठकीला सार्वजनिक बांधकाम विभागाचे मुख्य अभियंता अतुल चव्हाण, अधीक्षक अभियंता एस. एस. भगत, अधीक्षक अभियंता (विद्युत) श्रीमती समिधा सुरवसे, अधीक्षक अभियंता एन. व्ही. भंडे, विद्युत मंडळाचे अधीक्षक अभियंता दयानंद म्हात्रे, अधीक्षक अभियंता श्रीमती विभावरी वैद्य यांच्यासह विभागातील इतर वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

प्रकल्पांचे सादरीकरण आणि अर्थसंकल्पीय कामांचा आढावा

बैठकीदरम्यान अधीनस्थ कार्यालये, कार्यक्षेत्र, रस्ते व पूल यांची सांख्यिकी तसेच पुलांच्या तपशीलवार माहितीचे सादरीकरण करण्यात आले.

  • २०२२ सालापासून आजपर्यंत पूर्ण झालेली कामे आणि नाबार्ड (NABARD) अंतर्गत पूर्ण झालेले प्रकल्प.

  • ‘हायब्रीड अॅन्युइटी’ (Hybrid Annuity) अंतर्गत सुरू असलेल्या रस्ते व पूल प्रकल्पांची माहिती.

  • २०२६ च्या अर्थसंकल्पात मंजूर झालेल्या कामांचा आढावा घेऊन त्यांच्या अंमलबजावणीस तातडीने गती देण्याच्या सूचना मंत्री महोदयांनी दिल्या.

रुग्णालये आणि शासकीय इमारतींच्या गुणवत्तेवर भर

जिल्ह्यात प्रगतीपथावर असलेल्या इमारतींची कामे, शासकीय इमारती तसेच रुग्णालयीन इमारतींच्या गुणवत्तेकडे विशेष लक्ष देण्याचे निर्देश ना. शिवेंद्रसिंहराजे यांनी दिले. यावेळी विशेषत्वाने बीड येथील जिल्हा रुग्णालय आणि २०० खाटांच्या महिला रुग्णालयाच्या इमारतीच्या गुणवत्तेबाबतही सविस्तर माहिती घेण्यात आली.

खड्डे दुरुस्ती अन् वृक्ष लागवडीबाबत कडक निर्देश

“जिल्ह्यातील विविध रस्त्यांवरील खड्डे दुरुस्ती आणि प्रलंबित कामे तातडीने पूर्ण करा. पैठण व शिरूर परिसरातील प्रकल्पांबाबत तत्काळ कार्यवाही करा. नवीन कामांबरोबरच जुन्या कामांची दुरुस्ती करून नवीन प्रस्ताव सादर करा,” असे निर्देश ना. शिवेंद्रसिंहराजे यांनी दिले.

तसेच, वृक्ष लागवड उपक्रमांतर्गत लावण्यात आलेल्या झाडांची नियमित निगा राखली जाते का, याची माहिती घेऊन विश्रामगृह व शासकीय परिसरातील वृक्ष लागवडीची देखभाल सुनिश्चित करण्याचे आदेशही त्यांनी अधिकाऱ्यांना दिले. सर्व संबंधित अधिकाऱ्यांनी आपापली कामे वेळेत, गुणवत्तापूर्ण आणि जबाबदारीने पूर्ण करावीत, अशी स्पष्ट तंबीही मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी दिली.


Back to top button
Don`t copy text!