
दैनिक स्थैर्य | दि. १६ ऑगस्ट २०२६ | हिंगोली |
कॉकरोच जनता पार्टीचे (सीजेपी) संयोजक अभिजीत दीपके यांनी शनिवारी हिंगोली जिल्ह्यातील मूळ गावातून ‘स्कूल ठीक करो’ अर्थात ‘शाळा ठीक करा’ मोहिमेचा शुभारंभ केला. स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधून त्यांनी सरकारी शाळांमधील दूरवस्थेवरून सरकारवर जोरदार टीका केली तसेच खाजगी शाळांच्या फीवर मर्यादा आणण्याची मागणी केली.
दीपके यांनी स्वातंत्र्यदिनानिमित्त ‘संतूक पिंपरी’ या आपल्या मूळ गावी भेट देऊन तेथील ध्वजारोहण सोहळ्याला हजेरी लावली. यानंतर त्यांनी गावातील जिल्हा परिषद शाळेची पाहणी केली असता, तेथील स्वच्छतागृहांमध्ये पाण्याचा पुरवठाच नसल्याचे निदर्शनास आले.
दीपके यांनी पत्रकारांना सांगितले की, स्वातंत्र्याला ८० वर्षे पूर्ण होत आली तरी सरकारी शाळांमध्ये पाण्यासारख्या मूलभूत सुविधा उपलब्ध नसतील, तर देश कसा विकसित होणार? पाणी नसल्यास विद्यार्थ्यांनी शौचालयासाठी घरी जायचे का, असा सवाल त्यांनी केला. शाळेत पुरेशा बाकांची सोय नाही, विद्यार्थ्यांची संख्या जास्त असताना केवळ चारच बाकेच उपलब्ध आहेत, खासगी शाळांमध्ये बाके असतात, मग सरकारी शाळांमध्ये का नाहीत, असे ते म्हणाले.
गेल्या १० वर्षांत देशातील ९४,००० हून अधिक सरकारी शाळा बंद पडल्याचा दावा करत दीपके यांनी केंद्र सरकारवर शिक्षणाचा अर्थसंकल्प कमी केल्याचा आरोप केला. नवीन शाळा सुरू करण्याची गरज असताना सरकारी शाळा बंद करून खासगी शाळांचे भले केले जात आहे, असे ते म्हणाले.
