
दैनिक स्थैर्य | दि. १६ ऑगस्ट २०२६ | नागपूर |
युवा पिढी ही भारताची खरी लोकसंख्यात्मक लाभांश शक्ती (डेमोग्राफिक डिव्हिडंड) आहे. त्यांच्या क्षमतेचा योग्य वापर झाला तर भारत नक्कीच ‘विश्वगुरू’ बनेल. मात्र, या तरुण ताकदीचा योग्य उपयोग केला नाही, तर ३० वर्षांनंतर हीच पिढी वयोवृद्ध झाल्यावर देशावर मोठे ओझे बनेल, असे प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी शनिवारी येथे केले.
कस्तुरचंद पार्क येथे विशेष कार्यक्रमात तरुणांशी संवाद साधताना ते बोलत होते. यावेळी २०० फूट उंच राष्ट्रध्वज सरसंघचालकांच्या फडकावण्यात आला. हस्ते सार्वजनिक हिताचे मुद्दे मांडताना विरोध करणे आणि आंदोलने उभारणे हा लोकशाहीचा आवश्यक भाग आहे. मात्र, संवाद आणि चर्चा करताना देशाचे संविधान, कायदे आणि अखंडतेला कुठेही बाधा पोहोचता कामा नये, असे भागवत यांनी स्पष्ट केले. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांचा दाखला देत त्यांनी देशवासीयांना संविधानाच्या चौकटीत राहून एकत्र काम करण्याचे आवाहन केले.
इतर देशांशी भारताची तुलना न करण्याचे आवाहन करत भागवत म्हणाले, आपण अमेरिका, चीन किंवा ऑस्ट्रेलिया नाही; आपण ’भारत’ आहोत. भारताची प्रचंड लोकसंख्या आणि मर्यादित भूभाग पाहता, पाश्चात्य किंवा इतर देशांचे मॉडेल जसेच्या तसे येथे लागू पडू शकत नाही. आपल्याला आपल्या गरजा आणि संस्कृतीनुसार विकासाचा मार्ग आखावा लागेल. जग केवळ भौतिक प्रगतीचा विचार करते, तर भारत सर्वांगीण कल्याणाचा विचार करतो.
कष्टाला सन्मान
केवळ नोकर्यांमागे न धावता तरुणांनी उद्योजकता आणि कष्टाच्या कामांना सन्मान दिला पाहिजे, यावर त्यांनी भर दिला. तरुणांनी स्वतःचे आणि देशाचे भविष्य घडवण्यासाठी धैर्याने पुढे आले पाहिजे. देशाच्या प्रगतीतच आपले आणि आपल्या कुटुंबाचे भवितव्य सुरक्षित आहे, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
