सातारा जिल्हा परिषदेची पहिली सर्वसाधारण सभा शुक्रवारी; विषय समिती सदस्यांच्या निवडीबाबत उत्सुकता


सातारा जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष आणि उपाध्यक्ष निवडीच्या ड्राम्यानंतर शुक्रवारी पहिली विशेष सर्वसाधारण सभा होणार आहे. या सभेत विविध विषय समित्यांच्या सदस्यांची निवड होणार असून विरोधकांच्या आक्रमक भूमिकेकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

 स्थैर्य, सातारा, दि. १६ एप्रिल : सातारा जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष, उपाध्यक्ष आणि विषय समिती सभापती निवडीच्या वेळी झालेल्या हाय व्होल्टेज ड्राम्यानंतर, आता सर्वांचे लक्ष पहिल्या विशेष सर्वसाधारण सभेकडे लागले आहे. ही सभा शुक्रवारी दुपारी २ वाजता होणार असून, यामध्ये विविध समित्यांच्या सदस्यांच्या निवडी पार पडणार आहेत. विरोधकांच्या आक्रमक भूमिकेमुळे ही सभा वादळी ठरणार का आणि विरोधकांची नेमकी भूमिका काय राहणार, याबाबत झेडपी वर्तुळात मोठी उत्सुकता निर्माण झाली आहे.

अध्यक्षांच्या नेतृत्वाखाली होणार सभा अन् अधिकाऱ्यांची कसोटी

जि. प. अध्यक्षा डॉ. प्रिया शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली ‘छत्रपती शिवाजी महाराज सभागृहात’ ही सर्वसाधारण सभा पार पडणार आहे. या सभेत राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेचे विरोधी सदस्य विविध मुद्द्यांवरून सत्ताधाऱ्यांना धारेवर धरण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे सर्व विभागांच्या अधिकाऱ्यांना या सभेसाठी आपापल्या विभागाचा संपूर्ण लेखाजोखा घेऊन सज्ज राहावे लागणार आहे.

‘या’ महत्त्वाच्या समित्यांच्या सदस्यांची होणार निवड

या विशेष सभेमध्ये प्रामुख्याने खालील विषय समित्यांच्या सदस्यांची निवड केली जाणार आहे:

  • स्थायी समिती

  • जलव्यवस्थापन व स्वच्छता समिती

  • कृषी, समाजकल्याण, शिक्षण व क्रीडा समिती

  • बांधकाम, अर्थ, पशुसंवर्धन व दुग्धशाळा समिती

  • आरोग्य, तसेच महिला व बालकल्याण समिती

पदभाराचे वाटप आणि चर्चेचे विषय

सभेतील नियोजनानुसार, जि. प. अध्यक्षांकडे स्थायी व जलसंधारण समितीचे सभापतिपद, तर उपाध्यक्षांकडे आरोग्य व बांधकाम समितीचे सभापतिपद देण्यात येणार आहे. याशिवाय उपाध्यक्ष व सभापतींना विषय समित्यांचा पदभार सोपवणे, विषय समित्यांवर सदस्यांची निवड करणे आणि विभागप्रमुखांची विषय समित्यांचे सचिव म्हणून निवड करणे आदी ३ महत्त्वाचे विषय चर्चेला ठेवण्यात आले आहेत.

प्रशासन ‘अलर्ट’ मोडवर; मतदान अधिकाऱ्यांच्या नियुक्त्या

अध्यक्ष व उपाध्यक्ष निवड आणि विषय समिती सभापतींच्या निवडीवेळी झालेल्या राड्याच्या पार्श्वभूमीवर यावेळी प्रशासन पूर्णपणे ‘अलर्ट’ झाले आहे. सदस्यांच्या निवडी निर्विघ्नपणे पार पाडण्यासाठी प्रशासनाने मतदान अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या नियुक्त्या केल्या असून, त्यांना या प्रक्रियेबाबत विशेष प्रशिक्षणही दिले आहे. या निवडीसाठी विस्तार अधिकाऱ्यांची ‘मतदान अधिकारी क्रमांक १’, तर कनिष्ठ प्रशासन अधिकाऱ्यांची ‘मतदान अधिकारी क्रमांक २’ म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.


Back to top button
Don`t copy text!