श्री घाटाई देवी यात्रास्थळाच्या विकासासाठी २ कोटी ७६ लाखांचा निधी मंजूर; मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांच्या पाठपुराव्याला मोठे यश


साताऱ्यातील घाटवण येथील श्री घाटाई देवी यात्रास्थळाला ‘ब’ वर्ग दर्जा मिळवून दिल्यानंतर, आता मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांच्या प्रयत्नातून सुशोभीकरण व विविध विकासकामांसाठी २ कोटी ७६ लाखांचा निधी मंजूर झाला आहे.

स्थैर्य, सातारा, दि. १६ : राज्यातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या सातारा तालुक्यातील घाटवण येथील ‘श्री घाटाई देवी देवस्थान ट्रस्ट’ यात्रास्थळाला नुकताच ‘ब’ वर्ग दर्जा मिळाला आहे. त्यानंतर आता राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री श्रीमंत छ. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या सततच्या पाठपुराव्यातून या तीर्थस्थळाच्या सुशोभीकरणासह विविध विकासकामे मार्गी लावण्यासाठी तब्बल २ कोटी ७६ लाख ४० हजार रुपये निधी मंजूर करण्यात आला आहे.

या महत्त्वपूर्ण निधीमुळे या तीर्थस्थळाचे रूपडे पालटणार असून, भाविकांसाठी विविध प्रकारच्या दर्जेदार सोयी-सुविधा निर्माण होणार आहेत. हा निधी उपलब्ध करून दिल्याबद्दल ना. शिवेंद्रसिंहराजे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री सुनेत्राताई पवार यांचे विशेष आभार मानले आहेत.

‘क’ वर्गातून ‘ब’ वर्गात श्रेणीवर्धन आणि निधीची मंजुरी

जगप्रसिद्ध कास पठार परिसरात असलेल्या घाटवण येथील घाटाईदेवीच्या यात्रेला दरवर्षी हजारो भक्त आणि भाविक येत असतात. यापूर्वी या देवस्थानाला ‘क’ वर्ग दर्जा असल्याने तीर्थक्षेत्राच्या विकासासाठी मर्यादा येत होत्या. मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी राज्य शासनाकडे केलेल्या पाठपुराव्यामुळे राज्याच्या ग्रामविकास विभागाने ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर ग्रामीण यात्रास्थळ योजने’तून घाटाईदेवी तीर्थक्षेत्राला काही दिवसांपूर्वीच ‘ब’ वर्ग दर्जा प्रदान केला.

यावरच न थांबता, सन २०२६-२७ या आर्थिक वर्षात अर्थसंकल्पीत निधीतून (वेतनेत्तर) विकासकामांसाठी हा २ कोटी ७६ लाख ४० हजारांचा भरीव निधी मंजूर करण्यात आला आहे.

मंजूर निधीतून होणारी विकासकामे :

या निधीतून मंदिर परिसरात भाविकांच्या सोयीसाठी खालील कामे केली जाणार आहेत:

  • सुशोभीकरण : १ कोटी रुपये

  • भोजन कक्ष बांधणे : ५९ लाख ९० हजार रुपये

  • वाहनतळ (Parking) उभारणे : ५० लाख रुपये

  • महिला व पुरुष स्वच्छतागृह आणि स्नानगृह : ३० लाख रुपये

  • संरक्षक भिंत बांधणे : २० लाख रुपये

  • विद्युतीकरण करणे : १६ लाख ५० हजार रुपये

“मंजूर कामांची निविदा प्रक्रिया व इतर शासकीय सोपस्कार तातडीने पूर्ण करून कामे तत्काळ सुरू करा. तसेच, ही सर्व कामे दर्जेदार करून वेळेत पूर्ण करा,” अशा सक्त सूचना ना. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना दिल्या आहेत.


Back to top button
Don`t copy text!