दैनिक स्थैर्य । दि. १४ जुलै २०२२ । फलटण । शिवाजी ज्ञानदेव मुळीक यांचे प्राथमिक शिक्षण जिल्हा परिषद प्राथमिक शाळा सासकल येथे झाले तर माध्यमिक शिक्षण शिवशंकर माध्यमिक विद्यालय सासकल येथे झाले. कोणतंही काम हलकं नसतं असे समजून प्रचंड जिद्द, चिकाटी आणि कठोर परिश्रमाच्या बळावर शिवाजी मुळीक यांनी इथपर्यंत प्रवास केला. भारतीय सैन्य दलात भरती होण्यापूर्वी त्यांनी सर्व शेतातील कामे, किराणामाल दुकानात कामगार, गाडीवर क्लीनर, रस्त्यावरील कामे केली.
भारतीय सैन्य दलातील २२ मराठा लाईट इन्फंट्री(हैदराबाद) मध्ये २३ वर्षे प्रदीर्घ सेवा केल्यानंतर ते सेवानिवृत्त झाले. श्री शिवाजी ज्ञानदेव मुळीक यांचे जिल्हा सैनिक बोर्ड व सैनिक फेडरेशनच्या वतीने स्वागत व सन्मान करण्यात आला तसेच सासकल ग्रामस्थांनी, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा सासकलच्या शिक्षक विद्यार्थ्यांनी, आजी माजी सरपंच, तरुण मंडळे, शाळा सुधार संघटन, सासकल जन आंदोलन समिती, कुटुंबीय व मित्र मंडळींनी ही त्यांचे उस्फूर्त स्वागत केले.यावेळी त्यांच्या सौभाग्यवती सौ.स्वाती मुले ऋतुजा, ऋतुराज बंधू शंकर त्यांच्या पत्नी गीता मुले दिव्य व दीक्षा आई सुमन उपस्थित होते.
श्री शिवाजी मुळीक हे १९९९ मध्ये भारतीय सैन्य दलाच्या 22 मराठा लाईट इन्फंट्री मध्ये रुजू झाले त्यांची पहिली पोस्टिंग उरी सेक्टर येथे २ वर्षांसाठी झाली. त्यानंतर राजस्थान मधील जोधपूर येथे एक वर्ष, हैदराबाद येथे ३ वर्ष, मणिपूर येथे ३ वर्ष, राजस्थान मधील जामनगर येथे ३ वर्ष, कारगिल मधील द्रास सेक्टरमध्ये ३ वर्षे, पंजाब मधील फिरोजपुर येथे एक वर्ष, श्रीनगर मधील बांदीपुरा येथे १ वर्ष, पुणे येथील सदन कमान येथे ३ वर्ष, श्रीनगर मधील कुपवाड येथे १ वर्ष, गुजरात मधील गांधीनगर अहमदाबाद येथे ३ वर्ष अशी एकूण २३ भारतीय सैन्यदलात सेवा बजावली.आणि ते तिथेच सेवानिवत्त झाले.
त्यांना उत्कृष्ट सेवेसाठी MGE ME – Excellence award, GOC – in – commendation card -2 ने सन्मानित करण्यात आले. या 23 वर्षाच्या प्रदीर्घ सेवेमध्ये उरी या ठिकाणी प्रत्यक्ष शत्रूशी त्यांचा सामना झाला. तसेच मणिपूर येथे एन्काऊंटर मध्ये त्यांचा सहभाग होता, बांदीपुरा येथे राष्ट्रीय रायफल्स सोबत एका ऑपरेशन मध्ये त्यांचा सहभाग होता. तरुणांना संदेश देताना ते म्हणतात की, “आयुष्यामध्ये सैन्य दलातच नव्हे तर कोणत्याही इतर सेवांमध्ये सुद्धा देशसेवा करण्याची तरुणांनी मनीषा बाळगावी.आपण कायम इतरांना कमी लेखण्याचं, नावे ठेवण्याचे काम करतो. तेव्हा आपण आयुष्यात त्याग करून जरूर पहा. देशसेवा करून पहा. निश्चित सुख आणि समाधान लाभेल. येणाऱ्या काळात कुटुंबासाठी वेळ देणे. त्याच्यासोबत आपल्या गावाच्या, आपल्या परिसराच्या विकासासाठी झटणे हेच माझे उद्दिष्ट राहणार आहे. भारतीय सैन्य दलातील 22 मराठा लाईट इन्फंट्री (हैदराबाद) या नावाजलेल्या इन्फंट्री मध्ये येवढी प्रदीर्घ देशसेवा करण्याची मला संधी मिळाली याचे मला समाधान वाटते.ही इन्फंट्री एकमेव असेल की ज्या इन्फंट्री मध्ये सर्व जाती-धर्माचे माझे सैनिक बांधव होते. आम्ही ईद दिवाळीपासून ते सर्व धर्मियांचे सण गुण्यागोविंदाने साजरे करत होतो. मी माझ्या सेवा काळातील माझ्या सर्व सहकाऱ्यांचे, अधिकाऱ्यांचे, कुटुंबीयांचे व गावकऱ्यांचे मनापासून आभार मानतो.