
थेट WhatsApp वर मिळवा
‘सेवा संकल्प अभियान’ १७ ऑक्टोबरपर्यंत राबविले जाणार असून, सेवा सेतू शिबिरांतून नागरिकांना विविध शासकीय सेवा जवळच्या ठिकाणी उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत.
स्थैर्य, पुणे, दि. १९ सप्टेंबर : विविध शासकीय सेवा आणि योजनांचा लाभ पात्र नागरिकांपर्यंत अधिक सुलभपणे पोहोचविण्यासाठी राज्यात १७ सप्टेंबर ते १७ ऑक्टोबर या कालावधीत ‘सेवा संकल्प अभियान’ राबविण्यात येत आहे. प्रत्येक तालुक्यात ‘सेवा सेतू’ शिबिरे घेऊन महसूल, रेशन कार्ड, आधार, प्रमाणपत्रे, नळ व वीज जोडणीसह विविध सेवा नागरिकांना उपलब्ध करून देण्यावर या अभियानात भर देण्यात आला आहे.
सेवा सेतू शिबिरात कोणती कामे होणार?
नागरिकांना विविध कामांसाठी वारंवार शासकीय कार्यालयांच्या फेऱ्या माराव्या लागू नयेत, यासाठी प्रत्येक तालुक्यात ‘सेवा सेतू’ शिबिरे आयोजित केली जाणार आहेत. एकाच ठिकाणी विविध विभागांच्या सेवा उपलब्ध करून पात्र नागरिकांची प्रलंबित कामे मार्गी लावण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.
या शिबिरांमध्ये फेरफार नोंदी, स्वामित्व सनद, शेतपाणंद रस्ते, शिधापत्रिका, नॉन-क्रिमिलेयर प्रमाणपत्र, वनहक्क दावे, नळजोडणी, वीज जोडणी, दिव्यांग प्रमाणपत्र, विवाह नोंदणी, आधार, जन्म-मृत्यू प्रमाणपत्र, शिकाऊ वाहनचालक परवाना, महिला बचत गट नोंदणी आणि ज्येष्ठ नागरिक प्रमाणपत्रासंबंधी सेवा दिल्या जाणार आहेत. ७/१२ आणि ८-अ नोंदी अद्ययावत करण्याच्या कामाचाही यात समावेश आहे.
गावागावांत ‘सेवा माझे योगदान’
ग्रामीण भागात प्रत्येक गाव आणि वॉर्डात स्थानिक गरजेनुसार ‘सेवा माझे योगदान’ उपक्रम राबविला जाणार आहे. युवक, महिला, ज्येष्ठ नागरिक आणि सामाजिक क्षेत्रातील व्यक्तींना या उपक्रमाशी जोडले जाणार आहे.
गाव स्वच्छता, नदीघाट आणि बारवांची स्वच्छता, वृक्षारोपण, रक्तदान, आरोग्य तपासणी, प्लास्टिकमुक्तीबाबत जनजागृती, जलसंधारण, कचरा वर्गीकरण आणि रस्ते सुरक्षेबाबत जागृती अशा उपक्रमांना चालना दिली जाणार आहे.
जमीन आणि महसुलाची कामेही अभियानात
ग्रामीण भागातील नागरिकांसाठी महत्त्वाच्या असलेल्या फेरफार नोंदी, ७/१२, ८-अ, स्वामित्व सनद आणि वनहक्क दाव्यांशी संबंधित कामांवरही भर देण्यात आला आहे. वनहक्कांसाठी नवीन दावे स्वीकारणे, जुन्या दाव्यांमध्ये आवश्यक दुरुस्ती करणे आणि पात्र दावे निकाली काढण्याची प्रक्रिया अभियानाच्या कालावधीत पूर्ण करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
त्यामुळे महसूल आणि जमीनविषयक कामांसाठी नागरिकांना या अभियानाचा उपयोग होणार आहे.
अंगणवाड्यांमध्ये आरोग्य-पोषणाची माहिती
‘अंगणवाडी उत्सव’ उपक्रमातून माता आणि बालकांना अभियानाशी जोडले जाणार आहे. अंगणवाडी केंद्रांवर मातांना आरोग्य आणि पोषणविषयक योजनांची माहिती दिली जाणार असून मुलांसाठी विविध उपक्रम घेतले जाणार आहेत.
अंगणवाडी सेविका, मदतनीस आणि आशा कार्यकर्त्यांचा सन्मान करण्याचीही तरतूद करण्यात आली आहे. माता आणि बालकांच्या आरोग्याबाबत जागृती वाढविण्यावर या उपक्रमात भर असेल.
तरुणांच्या कल्पनांसाठी ‘इनोव्हेशन चॅलेंज’
युवा, विद्यार्थी, स्टार्टअप्स, व्यावसायिक, कॉर्पोरेट इनोव्हेटर्स आणि ग्रामीण भागात नवे उपाय विकसित करणाऱ्या व्यक्तींसाठी ‘इनोव्हेशन चॅलेंज’ आयोजित केले जाणार आहे. शैक्षणिक संस्था, स्टार्टअप नेटवर्क, इन्क्युबेशन सेंटर आणि खासगी कंपन्यांचा सहभागही घेतला जाणार आहे.
निवड झालेल्या कल्पनांना तज्ज्ञांसमोर सादरीकरणाची संधी दिली जाणार आहे. विद्यार्थ्यांसाठी ‘विकसित भारत’ आणि ‘मुलांच्या स्वप्नातील भारत’ या विषयांवर चित्रकला आणि वक्तृत्व स्पर्धाही आयोजित केल्या जाणार आहेत.
लाभार्थ्यांच्या घरी ‘आशीर्वादाचा दिवा’
शासकीय योजनांचा प्रत्यक्ष लाभ मिळालेल्या नागरिकांच्या घरी जाऊन ‘आशीर्वादाचा दिवा’ प्रज्वलित करण्याचाही उपक्रम अभियानात समाविष्ट आहे. यासोबतच ‘बदलाची गोष्ट’ उपक्रमातून योजनांमुळे नागरिकांच्या जीवनात झालेला बदल त्यांच्या अनुभवांच्या माध्यमातून मांडला जाणार आहे.
या अनुभवांचे व्हिडिओ आणि रील्सच्या माध्यमातून संकलन केले जाणार आहे. माहितीअभावी पात्र व्यक्ती शासकीय योजनांच्या लाभापासून वंचित राहू नये आणि प्रशासन व नागरिकांमधील संवाद वाढावा, हा ‘सेवा संकल्प अभियान’ राबविण्यामागील प्रमुख उद्देश आहे.
