दैनिक स्थैर्य । दि. २९ जुलै २०२३ । अमरावती । शेतकी उत्पादनासोबतच पूरक व्यवसायावर भर द्या. शेतकरी उत्पादक कंपन्या स्थापन करुन गुरांच्या चाऱ्यांचे उत्पादन घ्या. जेणेकरुन वर्षभर पशुपालकांना हिरवा चारा उपलब्ध होईल. महागड्या पशुखाद्याला पर्याय म्हणून मका, सोयाबिन, तांदुळाच्या चुरीपासून पशु खाद्य निर्माण करण्यावर भर द्या, असे आवाहन केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी आज केले.
नांदुरा बु. येथील गोकुलम गोरक्षण संस्थेच्या अत्याधुनिक पशु चिकित्सालय, पशु मोबाईल ॲम्बुलन्स तसेच पक्षीघराचे लोकार्पण श्री. गडकरी यांच्या हस्ते करण्यात आले, त्यावेळी ते बोलत होते.
खासदार अनिल बोंडे, आमदार प्रवीण पोटे पाटील यांच्यासह जीव जंतु मुंबई कल्याण मंडळाचे सदस्य गिरीशभाई शहा, श्रीमद राजचंद्र जीवदया ट्रस्टचे रतनभाई लुनावत, आदीजीन युवक चॅरिटेबल ट्रस्टचे जयेशभाई शहा, मेहता चॅरिटेबल ट्रस्टचे विजयभाई वोरा, भरतभाई मेहता, गोसेवा आयोग महाराष्ट्र शासनाचे अध्यक्ष शेखर मुंदडा, डॉ. हेमंत मुरके, डॉ. करुणा मुरके, विनय बोथरा, विजय बोथरा, अशोक मुंधडा आदी मान्यवर उपस्थित होते.
श्री. गडकरी म्हणाले की, गोकुलम गोरक्षण संस्थेत वृध्द, रुग्ण, भाकड, निराश्रीत, अपघातग्रस्त, गोवंशाची व प्राण्यांची सेवा करण्यात येते. अशी भूतदया संस्थेमार्फत करण्यात येते, ही आनंदाची बाब आहे. प्राण्यांची सेवा करणे आपले सर्वांचे कर्तव्य आहे. शेतीपूरक व्यवसायासाठी गोवंश वृध्दी आवश्यक आहे. शेतकऱ्यांचे पूरक व्यवसायातून आर्थिक उत्पन्न वाढावे, यासाठी मदर डेअरीची स्थापना करण्यात आली. मदर डेअरीच्या दुग्धज उत्पादनासह संत्रा बर्फीलाही चांगली मागणी आहे. त्याला विदर्भात शेतकऱ्यांचा चांगला प्रतिसाद लाभत आहे. त्याचप्रमाणे गाईच्या शेणापासून पेंटची निर्मिती करण्यात येते. अशा व्यवसायांची वृध्दी होणे आवश्यक आहे. अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करुन शेतीपूरक व्यवसाय वाढविल्यास शेतकऱ्यांच्या उत्पादनात निश्चितच वाढ होईल, असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.
देशी गाईंच्या प्रजातींचे संवर्धन करा. 20 लिटरपेक्षा जास्त दूध देणाऱ्या देशी गाईंचे संवर्धन करा. त्यामध्ये कृत्रिम रेतन पध्दतीने सॉर्टेड सिमेन (लिंग निर्धारित वीर्यमात्रा) वापरुन चांगल्या दुधारु गाईंची निर्मिती करावी. या तंत्रज्ञानाचा वापर करुन कमी वेळात जास्तीत जास्त मादी वासरे जन्माला येऊ शकतात. सोबतच भ्रूण प्रत्यारोपण या नवीन तंत्रज्ञानाचा वापर करुन चांगल्या प्रतींच्या गाईंची निर्मिती करा. या माध्यमातून विदर्भामध्ये प्रत्येक दिवशी 30 लक्ष लिटर दुधाची निर्मिती व्हावी. त्याचे नियोजन मदर डेअरीमार्फत करण्यात यावे, असेही ते यावेळी म्हणाले.
कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात डॉ. हेमंत मुरके यांनी गोकुलम गोरक्षण संस्थेबाबत माहिती दिली. संस्थेची स्थापना 2013 ला झाली असून चाळीस एकर परिसरामध्ये याचा विस्तार झाला आहे. सध्या गोरक्षण संस्थेमध्ये 278 आजारी गोवंशाचे पालन पोषण करण्यात येत आहे. परिसरातील रुग्ण व अपघातग्रस्त प्राणी व पशुपक्ष्यांवर नि:शुल्क औषधोपचार, चिकित्सा, शस्त्रक्रिया करणारी ही राज्यातील एकमेव संस्था आहे. गोकुलम मध्ये 2 पशुरुग्णवाहिका उपलब्ध असून परिसरातील अपघातग्रस्त पशुंसाठी चोवीस तास नि:शुल्क सेवा पुरविण्यात येते. मागील 8 वर्षात 31 हजार 586 पशुपक्षी व प्राण्यांवर उपचार येथे करण्यात आले आहे. त्यासाठी पुर्णवेळ 4 पशुवैद्य नेमले असून 10 पेक्षा जास्त सेवानिवृत्त पशुसंवर्धन अधिकारी सेवाव्रती नि:शुल्क सेवा देतात. तसेच संस्थेत गोवंशाच्या शेण आणि गोमुत्रापासून पंचगव्य उत्पादनाची निर्मिती व विक्री करण्यात येते. गोआधारित शेतीसाठी गांडूळ खत, कीटकनियंत्रक तयार करण्यात येते. तसेच गोकुलमच्या माध्यमातून शेतकऱ्यांचे प्रशिक्षण शिबिर आयोजित करण्यात येतात.
कार्यक्रमाचे संचालन पंडित देवदत्त शर्मा यांनी तर आभार डॉ. करुणा मुरके यांनी मानले.