प्रवचने – भगवंताची तळमळ लागायला पाहिजे

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

ज्याला जे आवडते ते आपण केले तर त्याला गोडी लागते. भगवंताला प्रेमाशिवाय दुसर्‍या कशाचीच गरज नसते. भगवंताचे प्रेम यायला त्याच्याशी आपलेपणा लावून ठेवावा. भगवंत जोडल्याशिवाय नाहीच राहणार, असे ठरवावे. भगवंत जोडावा हे ठरल्यावर, मला लोक नावे ठेवतील याचा कशाला विचार करावा ? निश्चय आहे तिथे सर्व काही सुचते. तळमळ लागली म्हणजे मार्ग दिसतो. साधुसंत मार्ग दाखवायला सतत तयार असतात; मात्र आपण आपली देहबुद्धी बाजूला ठेवून त्यांना शरण जावे.

सर्व जग जर भगवंताचे आहे तर मग काळजीचे कारण काय ? उपाधी कोणी लावून घेतली ? माझी मीच ! मी निर्दोष होईन तेव्हाच लोक मला तसे दिसतील. आपल्या सर्व अवगुणांना कारण म्हणजे ‘मी रामाला विसरलो’ हेच आहे. परमात्म्याचा विसर पडतो हेच खरे पाप. कोणी पाहात नसेल तिथे वाईट कर्म आपण करतो; पण भगवंत चोहोकडे पाहतो आहे अशी जाणीव ठेवली, म्हणजे असे पाप घडणार नाही. कोणतेही कर्म करताना फळाची आशा धरली तर ते घातुक होते. ज्याने भगवंत जवळ आणला जातो तेच चांगले कृत्य. स्नानसंध्या केली आणि व्यवहार खोटा केला, तर त्या संध्येचा काय उपयोग ? मनात कोणताही हेतू न धरता परमेश्वरावर श्रद्धा ठेवून वागावे. मन परमेश्वराला अर्पण करावे, व दुसरीकडे गुंतवू नये. एकदा अर्पण केलेल्या मनाला जर पुनः विषयाचा आनंद झाला, तर ते अर्पण झाले नाही असे समजावे. माझा प्रयत्‍न व्हायचा असेल तसा होवो, पण तुझा विसर पडू देऊ नको, असे अनन्य भावाने भगवंताला म्हणावे. प्रत्येक कृतीत, ‘मी भगवंताचा आहे’ ही जाणीव ठेवावी. पडत्या काळातही जो भगवंताचा होऊन राहतो त्याला कशाचीच भिती नाही वाटत. पांडवांच्याजवळ प्रत्यक्ष भगवंत असताना त्यांना कितीतरी संकटे सोसावी लागली ! संकटे येऊ देऊन मग त्यातून बाहेर काढण्यापेक्षा भगवंताने संकटे टाळलीच का नाहीत, याचे उत्तर देणे सोपे आहे. पुष्कळ वेळा, आपल्यावर येणारे संकट कुणी टाळले, तर ते संकट येणारच नव्हते असे आपण समजतो. खरे सांगायचे म्हणजे संकटे ही आपल्या कर्माचीच फळे असतात. संकटांमध्ये भगवंताच्या अस्तित्वाची जाणीव राहिली तर ती आपल्याला समाधान देते. ज्यांना सर्व अनुकूल आहे त्यांनादेखील समाधान हे नसतेच; म्हणून ज्यांना तितकी अनुकूलता नाही त्यांनी त्याबद्दल असमाधान ठेवण्याचे कारण नाही, कारण समाधान हे त्यामध्ये नाहीच नाही. असमाधान हा रोग सर्वांचा एकच आहे, आणि भगवंताचे स्मरण हे औषधही सर्वांना एकच आहे.

ज्याचे समाधान भगवंतावर अवलंबून आहे, त्याचे समाधान कोणत्याही परिस्थितीमध्ये टिकेल.


Back to top button
Don`t copy text!