दैनिक स्थैर्य | दि. २८ मे २०२३ | फलटण |
सासकल (ता. फलटण) ग्रामपंचायतीच्या विद्यमान सरपंच उषा राजेंद्र फुले यांना जिल्हाधिकारी रूचेश जयवंशी यांनी महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियमाप्रमाणे शासकीय जागेत अतिक्रमण केल्याप्रकरणी अपात्र घोषित केले आहे. सरपंच उषा फुले यांना अपात्र घोषित करण्यासाठी त्यांच्या विरोधात विनायक नारायण मदने यांनी अर्ज दाखल केला होता. तो अर्ज जिल्हाधिकार्यांनी मान्य करून फुले यांना अपात्र ठरविले.
याअगोदर सासकल ग्रामपंचायतीचे उपसरपंच नितीन धनाजी घोरपडे यांना ग्रामपंचायत अधिनियमाप्रमाणे जिल्हाधिकार्यांनी ग्रामपंचायत सदस्य म्हणून राहण्यास अपात्र ठरवले होते त्यांना तीन अपत्य असल्याबाबतची तक्रार राजेंद्र धोंडीबा घोरपडे यांनी केली होती.
आता सासकल ग्रामपंचायतीच्या विद्यमान सरपंच उषा राजेंद्र फुले यांनी सिटी सर्वे नंबर ३३६ मध्ये शासकीय जागेवर अतिक्रमण केल्याची तक्रार विनायक नारायण मदने यांनी दिली होती. यासंबंधी उपजिल्हाधिकारी प्रशांत आवटे यांनी गटविकास अधिकारी पंचायत समिती फलटण यांना सिटी सर्वे नं.३३६ ची मोजणी करून अहवाल देण्यास सांगण्यात आले होते. उपअधीक्षक भूमी अभिलेख फलटण यांनी सदर गटाची मोजणी करण्याबाबत ग्रामसेवक ग्रामपंचायत सासकल यांना कळवले होते. मात्र, मनमानी कारभाराचे उदाहरण ठरलेल्या सासकल ग्रामपंचायतीतील सत्तारूढ गटाच्या ग्रामपंचायत सदस्यांनी व सरपंचांनी जिल्हाधिकारी सातारा यांचे व गटविकास अधिकारी पंचायत समिती फलटण यांचे आदेश धुडकावून लावत मनमानी पद्धतीने बहुमताने चार विरुद्ध दोन असा ठराव घेऊन मोजणी फी भरणा न करण्याचा निर्णय घेतला. सदर निर्णय हा शासकीय आदेशाचे अवमूल्यन करणारा व आदेशाची पायमल्ली करणारा होता. त्यामुळे जिल्हाधिकारी सातारा यांनी शासकीय जागेत अतिक्रमण केल्याप्रकरणी उषा राजेंद्र फुले यांना दोषी ठरवून अपात्र केले आहे.
दरम्यान, सासकल ग्रामपंचायत मध्ये झालेल्या भ्रष्टाचाराची चौकशी पूर्ण झाली असून तक्रारदारांच्या अकरा मुद्द्यांपैकी नऊ मुद्द्यांमध्ये अनियमितता व भ्रष्टाचार झाला असल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे. तत्कालीन सरपंच व विद्यमान ग्रामपंचायत सदस्य लता विकास मुळीक, तत्कालीन सरपंच विभूती मोहन मुळीक, तत्कालीन उपसरपंच संजय बबन चांगण व तत्कालीन ग्रामसेवक अंगराज खाशाबा जाधव यांच्यावर लवकरच कारवाई सुरू करणार असल्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद सातारा यांनी सांगितले आहे.