प्रवचने – कोणत्याही कृतीत हेतु शुद्ध पाहिजे

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

तमोगुण हा तिन्ही गुणांत जास्त जड असल्याकारणाने त्याचा परिणाम या जगामध्ये लगेच दिसून येतो. दुष्ट बुद्धी हा तमोगुणाचा परिणाम आहे. परंतु भगवंताच्या नामाने बुद्धी स्वच्छ करण्याची सोय माणसाच्या ठिकाणी आहे. यासाठी पुष्कळ नामस्मरण करावे, म्हणजे सत्त्वगुणाचा उदय होतो आणि बुद्धी शुद्ध बनते. देहाला कष्ट दिले म्हणजे भगवंत वश होतो हे काही खरे नाही. तसे जर असते तर रस्त्यात उन्हामध्ये खडी फोडण्यार्‍यांना भगवंत लवकर वश झाला असता ! भगवंताचे लक्ष आपल्या देहापेक्षा मनाकडे असते. आपल्या मनामध्ये प्रापंचिक हेतू ठेवून भगवंताच्या नावाने उपवासासारखे कष्ट केले तरी, ते पाहून लोक फसतील, पण भगवंत फसणार नाही. आपण जसे बोलतो तसे वागण्याचा अभ्यास करावा. परमार्थामध्ये ढोंग फार बाधक असते. प्रापंचिक गोष्टीकरता उपवास करणे मला पसंत नाही. उपवास घडावा यात जी मौज आहे ती उपवास ‘करावा’ यामध्ये नाही. भगवंताच्या स्मरणामध्ये इतके तल्लीन व्हावे की आपण नेहमी त्याजवळ वास करतो आहोत असे मनाला वाटावे. मग देहाने अन्न खाल्ले म्हणून बिघडले कुठे ? या‍उलट, आपल्या चित्तांत भगवंताचे नाम नसतांना आपण देहाने पुष्कळ उपवास केले, तरी अशक्तपणा शिवाय दुसरे काही पदरात पडणार नाही. काही लोक वेडे असतात; त्यांना आपण उपासतापास कशासाठी करतो आहोत हेच समजत नाही. कोणत्याही कृतीला वास्तविक मोल तुमच्या हेतूवरून येते. हेतू शुद्ध असून एखादे वेळी कृती बरी नसली तरी भगवंताच्या घरी चालते; पण हेतू चांगला नसून कृती मात्र फार चांगली असली तरी भगवंत त्यापासून दूरच राहतो. माणसाने केलेला उपवास निष्काम असून, तो केवळ भगवंताच्या स्मरणात राहावे म्हणून केलेला असला तर फारच उत्तम आहे. निष्काम कर्माचे फार फार महत्त्व आहे. ‘भगवंतासाठी भगवंत हवा’ अशी आपली वृत्ती असावी. किंबहुना, नाम घेत असताना, प्रत्यक्ष भगवंत समोर ठाकला, आणि ‘तुला काय पाहिजे ?’ असे त्याने विचारले, तर ‘तुझे नामच मला दे’ हे त्याच्याजवळ मागणे, याचे नाव निष्कामता होय. कारण, रूपाने व्यक्त झालेला भगवंत केव्हातरी नाहीसा होईल, पण त्याचे नाम मात्र अखंड टिकेल; आणि त्याचे नाम घेतले की त्याला आपल्याकडे येणे जरूर आहे. म्हणून, देहाला कष्ट देण्याच्या भानगडीत न पडता भगवंतासाठीच नाम घेत असावे. त्याची कृपा झाल्याशिवाय राहणार नाही.

जेथे नाम तेथे राम हा ठेवावा विश्वास । कृपा करील रघुनाथ खास ॥


Back to top button
Don`t copy text!