खाकीचीच मानसिकता ढळू लागल्याने आरोग्याच्या सुरक्षिततेसाठी वरिष्ठांनी लक्ष देणे गरजेचे


स्थैर्य, सातारा, दि. 22 : जिह्यात  करोना बाधितांचे आकडे दिवसेंदिवस वाढतच चालले आहेत. त्यातच प्रशासनाने परजिह्यात असणाया नागरिकांना परवाने देऊन घरी जाण्याची मुभा दिली आहे. त्यामुळे तर जिह्याच्या विविध भागात करोना बाधितांची संख्या वाढतच आहे. ही परिस्थिती हाताळण्यासाठी पोलीस प्रशासन शर्तीचे प्रयत्न करीत आहे. मात्र बाधित क्षेत्रात बंदोबस्तावर काम करत असणाया पोलीस कर्मचाऱ्यांना अडचणींचा सामना करावा लागत आहे.  करोनाच्या धास्तीने त्यांची शारीरिक व मानसिक स्थिती बदलण्याच्या मार्गावर असून पोलीस दादांवरील कामाचा ताण वाढत आहे. खाकीचीच मानसिकता ढळू लागल्याने त्यांच्या आरोग्याच्या सुरक्षिततेसाठी वरिष्ठांनी लक्ष देणे गरजेचे आहे. तसेच बंदोबस्तावरील कर्मचाऱ्यांना गुन्हांच्या तपासासाठी वरिष्ठांकडून तगादा लावला जात असल्याने त्यांचीही चांगलीच दमछाक होत आहे.

पोलीस प्रशासन कोणत्याही परिस्थितीत आलेल्या संकटाला तोंड देण्यासाठी कायमच उभे असते. सध्या जगासह देशावर कोरोना विषाणूच्या संसर्गाचे संकट गडद होत चालले आहे. सातारा जिह्याचा कोरोना बाधितांचा आकडा द्विशतकाकडे वाटचाल करत आहे. अशा परिस्थितीत आरोग्य यंत्रणेबरोबरच पोलीस प्रशासनही शर्तीचे प्रयत्न करीत आहे. मात्र, करोनाचा धोका या दोन्ही यंत्रणांना असल्याचे वेळोवेळी समोर आले आहे. आज पोलीस कर्मचाऱ्यांना करोनाची लागण झाल्याचा आकडा वाढत आहे तर काही कर्तव्यदक्ष अधिकायांचाही करोनाने जीव घेतला आहे. सरकारने नागरिकांना आपल्या गावी जाण्यासाठी परवानी देऊन प्रवासासाठी मुभा दिली आहे. त्यामुळे पुण्या-मुंबईसह अन्य प्रांतातून लोकांचे लोंढे जिह्यात येऊ लागले आहेत. या सर्वाचा ताण पोलिस कर्मचाऱ्यांवर वाढला असून त्यांची शारीरिक व मानसिक अवस्था बदलण्याचे मार्गावर आहे.

बाधित गावाला पोलीस बंदोबस्त दिला जात आहे. त्यामुळे बंदोबस्तावर असलेले पोलीस कर्मचारी  करोना संसर्गाच्या भीतीच्या छायेत आहेत. बाहेरून येणा-या जाणाऱ्यांची त्यांना नोंद ठेवावी लागत असून त्या नोंदीसाठी आलेल्या प्रवाशांशी संपर्क येत असल्याने व पुढील प्रवासी बाधित आहे की नाही याची कोणतीही कल्पना नसल्याने पोलीस कर्मचाऱ्यांना धोका निर्माण होत आहे. त्यासाठी अद्यावत सुरक्षा यंत्रणा बंदोबस्तावर काम कर्मचाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यांना पुरवणे गरजेचे आहे.

नुकताच मुंबईत अमोल कुलकर्णी या कर्तव्यदक्ष अधिकाऱ्याचा करोनाने बळी घेतला. यामुळे त्यांच्या कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला. कामाचा ताण आणि पुरेसा आराम नसल्याने पोलीस कर्मचाऱ्यांना स्वतःच्या आरोग्याकडे लक्ष देण्यासाठी वेळ मिळत नाहीये. त्यामुळे त्यांची शारीरिक व मानसिक स्थिती बिघडून आरोग्याला धोका निर्माण होत आहे. काही कर्मचाऱ्यांना उच्च रक्तदाब मधुमेह यांसारखे आजार असल्याने त्यांचा धोका वाढतच आहे. शिवाय कामाचा ताण लक्षात घेता पोलीस कर्मचाऱ्यांची कुटुंबीय काळजीत पडले असून तेही  करोनाने धास्तावलेल्या आहेत.

बहुतांशी पोलीस कर्मचारी हे बंदोबस्तावर असून त्यांच्याकडे गुन्हच्या तपासासाठी ही तगादा लावला जात आहे. दिवस-रात्र बंदोबस्त करून गुन्हच्या तपासासाठी पुरेसा वेळ कर्मचाऱ्यांना मिळत नसल्याने तपासाचे काम रेंगाळत आहे. अशा परिस्थितीत वरिष्ठांनी गुह्यांसाठी कर्मचाऱ्यांना धारेवर न धरता त्यांना वेळ देणे गरजेचे आहे. त्यामुळे त्यांच्यावरील ताण कमी होऊन त्यांचे आरोग्यही सुस्थितीत राहणार आहे.

करोना संसर्गाच्या भीतीने प्रत्येक जण घरी बसला आहे. मात्र आरोग्य व पोलिस यंत्रणा तसेच प्रशासन रस्त्यावर उभे आहे. अशा परिस्थितीत कोरोना संसर्गाचा धोका यांना जास्त प्रमाणात आहे. पोलीस कर्मचाऱ्यांना रात्रंदिवस बंदोबस्तासाठी काम करावे लागत असल्याने त्यांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. अशा परिस्थितीत आम्हीपण माणसेच आहोत ना असा प्रश्न उपस्थित होत आहे.


प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Don`t copy text!