नवरी नटली


स्थैर्य, मुंबई, दि. 22 : मुंबईच्या स्थित्यंतराचा काळ होता म्हणा ना तो मुंबईतील मिल कामगारांचा संप फसला होता. जातीय दंगल आणि बॉम्बस्फोट यांनी मुंबई हादरली होती. सगळीकडे संशयाचे आणि  भीतीचे वातावरण आणि दडपण खास करून हिंदू मुस्लिम संमिश्र वस्तीत. अशा वातावरणात आम्ही रहात असलेल्या कुरल्यातील मुस्लिम बहुल विभागात आमच्या बिल्डिंगच्या आवारात असलेल्या घरात नवीन घराची उभारणी केल्यामुळे गृह प्रवेश आणि सत्यनारायणाची पूजा ठेवली होती. त्यानंतर रात्री जागरण गोंधळ सगळी बिल्डिंग आपल्याच घरचं कार्य असल्यासारखी आपआपल्या नेमून दिलेल्या कामात गुंतली होती.

दंगलीमध्ये बिल्डिंगच्या सभोवतालचे कंपाउंड आम्ही नीटनेटके म्हणजे मजबूत केले होते. त्याला एक लोखंडी दरवाजा आणि बिल्डिंगच्या सभोवती सिमेंटचा कोबा आत्ता आम्ही कंपाउंड मुळे सुरक्षित आणि बाहेरील जगा पासुन अलिप्त झालो होतो. पूजा झाली आणि जागरण गोंधळाचा कार्यक्रम सुरू झाला. गोंधळ्याने चौक भरला पूजेला बसलेल्यांच्या कपाळावर मळवट भरला गोंधळ्याने भंडारा उधळला. संबळ कडाडू लागला गोंधळ्याने देवदेवतांना गोंधळास येण्यासाठी अवतानास सुरुवात केली. मोरगावच्या मोरेश्वरा गोंधळाला या वो जेजुरीच्या खंडेराया जगरणाला या वो आणि सुरू झाला संबळ आणि तुणतूण्याच्या आणि सहकाऱ्यांच्या साथीने आईचा गोंधळ उदे ग अंबे उदे संबळाच्या जोरदार आवाजाने आजूबाजूचे मुस्लिम तरुण गोळा झाले. साशंक होऊन दरवाज्याच्या फटीतून गोंधळ पाहू लागले. थोडा वेळ उभं राहून निघून गेले रात्र वाढली आणि गोंधळ्याने मनोरंजन म्हणून आपलं खास पारंपरिक गाणं गण्यास सुरुवात केली. गाणं संपता संपता मगासचे ते मुस्लिम युवक पुन्हा दरवाज्यापाशी आले आणि ते आत येऊ लागले. वातावरण थोडे तंग झाले. गाणं थांबलं…सगळीकडे शांतता पसरली खरतर मुस्लिम मोहल्ल्यातील आमची ही दुसरी पिढी. आम्ही सगळे एकमेकांना नावानिशी ओळखत होतो. एकत्र खेळलो होतो वाढलो होतो. पण दगलीमुळे वातावरण गढूळ झालं होतं आम्ही त्या युवकाच्या म्होरक्याला काय…असं… खुणेने विचारले…तो आत येऊन म्हणाला…भाई ये पंडीत अभी जो गाना गा रहा था…उसको वो फिरसे गाने को बोलो…हम लोगोने बाहरसे सुना… पुरा सुना नाही…आम्ही सगळे जोरात हसलो. अच्छा भाई वन्स मोर…आम्ही म्हणालो…आवो बैठो… सगळे बसले…त्यातील एक जण म्हणाला…भाई वो ड रम भी बाजानेको बोलो…भोत अच्छा है…आम्ही सगळे असलो…त्याला संबळ म्हणायचे होते…आम्ही गोंधळ्याला वन्समोरचा इशारा केला. गोंधळ्यावर प्रत्येक कडव्यानंतर नोटांचा वर्षाव झाला…बेभान होऊन आपल्या साथीदारांसह गोंधळ जागरण सादर करणारा तो गोंधळी होता छगन चौगुले आणि ते गाणं होतं.. खंडेरायाच्या लग्नाला  बानू नवरी नटली…नवरी नटली…काल बाई सुपारी फुटली.

काल छगन चौगुले यांचे दुःखद निधन झाले…त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली…जो पर्यंत भांडाऱ्याने पिवळ्या झालेल्या जेजुरीच्या नवलाख पायऱ्या आहेत…गार  हवा जिथे वाहते तो काळूबाईंचा डोंगर आहे…बाळूमामांची मेंढेर आहेत…देव देवता आहेत…जागरण गोंधळ कुळाचार आहे तो पर्यंत छगन चोगुले त्यांच्या आवाजाच्या गाण्याच्या रूपाने अमर आहेत.

या देवीचा या काळूबाईंचा मळवट भरवा… न बाईला सोसना गारवा..गार डोंगराची हवा न बाईला सोसना गारवा…

संदीप शशिकांत विचारे


प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Don`t copy text!