दैनिक स्थैर्य | दि. २४ मार्च २०२३ | फलटण |
‘रयत शिक्षण संस्था’ ही आशिया खंडातील सर्वात मोठी शिक्षण संस्था असून, रयत उभी करताना अनेकांनी कर्मवीर भाऊराव पाटील यांना दातृत्वाची साथ दिली. त्यागमूर्ती स्व. सौ. लक्ष्मीबाई भाऊराव पाटील यांनी सर्वस्वाचा त्याग करून दीडशे तोळे सोन्याचे दागिने रयतेच्या लेकरांसाठी अण्णांच्या स्वाधीन केले. त्यांना दागिन्यांपेक्षा अण्णांचे शैक्षणिक कार्य महत्त्वाचे होते. एवढे समर्पण आज पाहावयास मिळत नाही. त्यांच्या त्यागातून ‘रयत’ उभी राहिली आहे. हा त्याग अलौकिक आहे. दातृत्वाचा खजिना म्हणजे त्यागमूर्ती ‘लक्ष्मीबाई’ होत, असे प्रतिपादन साहित्यिक, समूपदेशक ताराचंद्र आवळे यांनी केले.
रयत शिक्षण संस्थेचे श्री जितोबा विद्यालय, जिंती, तालुका फलटण येथे स्व. सौ. लक्ष्मीबाई भाऊराव पाटील पुण्यतिथीनिमित्त आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात आवळे बोलत होते. यावेळी मुख्याध्यापिका सौ. विद्या शिंदे, सौ. शीतल बनकर, गोविंद खिलारी उपस्थित होते.
ताराचंद्र आवळे पुढे म्हणाले की, माणसाने संकुचित वृत्ती सोडून मोठ्या मनाने विचार केला पाहिजे. ‘माणुसकी’ हा धर्म पाळून एकमेकांच्या मदतीला धावून गेले पाहिजे. तसेच माणुसकी टिकली पाहिजे. कर्मवीर भाऊराव पाटील व सौ. लक्ष्मीबाई यांच्या कार्यामुळे महाराष्ट्र सुजाण झालेला दिसतो. त्यांचे ऋण न फिटणारे आहे. त्यांच्या त्यागाचे फलित म्हणजे सातारा येथे नव्याने आकार घेणारे ‘कर्मवीर भाऊराव पाटील विद्यापीठ’ होय. हा त्यांच्या त्यागाचा सन्मान आहे.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला त्यागमूर्ती स्व. लक्ष्मीबाई पाटील यांच्या प्रतिमेचे पूजन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी मुख्याध्यापिका सौ. विद्या शिंदे यांनी आपले मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ. अर्चना सोनवलकर यांनी केले तर आभार प्रदीप माने यांनी मानले. यावेळी गजानन धर्माधिकारी, राजेंद्र घाडगे, ग्रामस्थ व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.