मुधोजीच्या १९ वर्षांखालील मुलांच्या फुटबॉल संघाची विभागस्तरीय स्पर्धेसाठी निवड

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

दैनिक स्थैर्य | दि. २८ सप्टेंबर २०२४ | फलटण |
सातार्‍यातील छत्रपती शाहू स्टेडियम येथे सोमवार, दि. २४ सप्टेंबर रोजी झालेल्या जिल्हास्तरीय शालेय फुटबॉल स्पर्धेमध्ये मुधोजी हायस्कूल व ज्युनिअर कॉलेजच्या १९ वर्षांखालील मुलांच्या संघाने उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन करून या स्पर्धेचे विजेतेपद पटकावून संघाची विभागस्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली.

या स्पर्धा सातारा येथील छत्रपती शाहू स्टेडियमवर खेळण्यात आल्या. या स्पर्धेतील पहिला सामना खटाव तालुक्याविरुद्ध झाला. हा सामना ३-० गोलने जिंकून स्पर्धेचे उपांत्यफेरी गाठली. या सामन्यामध्ये साद कुरेशी, जुनेद शेख व ओम भोईटे यांनी प्रत्येकी एक गोल नोंदवला.

या स्पर्धेचा उपांत्य सामना खंडाळा तालुक्याविरुद्ध झाला. हा सामनादेखील २-० गोलने जिंकून संघाने स्पर्धेची अंतिम फेरी गाठली. या सामन्यात प्रसन्न सरगर व ओम शिंदे यांनी प्रत्येकी एक गोल नोंदवला व संघाने अंतिम फेरीत प्रवेश केला.

या स्पर्धेचा अंतिम सामना महाबळेश्वर तालुक्याविरुद्ध झाला. हा सामना अतिशय चुरशीचा झाला व अंतिम सामन्यामध्ये निर्णायक गोल अभिषेक फडतरे याने नोंदवत जिल्हास्तरीय शालेय फुटबॉल स्पर्धेचे विजेतेपद पटकावले.

या विजयी संघाला ज्येष्ठ फुटबॉल प्रशिक्षक संजय फडतरे व क्रीडा मार्गदर्शक प्रशिक्षक अमित काळे, मुधोजी हायस्कूलचे क्रीडा मार्गदर्शक अमोल नाळे, संकेत मठपती व क्रीडा सहकारी कु. श्रवण वळकुंदे व मोनील शिंदे यांनी मोलाचे मार्गदर्शन केले.

विभागस्तरीय फुटबॉल स्पर्धेसाठी संघाची निवड झाल्याबद्दल सर्व यशस्वी खेळाडूंचे व त्यांना मार्गदर्शन करणारे प्रशिक्षक यांचे विधान परिषदेचे माजी सभापती श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर, आमदार दीपक चव्हाण, फलटण कृषी उत्पन्न बाजार समितीचे चेअरमन श्रीमंत रघुनाथराजे नाईक निंबाळकर, महाराष्ट्र खो-खो असोसिएशनचे अध्यक्ष श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर, फलटण एज्युकेशन सोसायटीच्या क्रीडा समितीचे चेअरमन शिवाजीराव घोरपडे, सदस्य महादेवराव माने, शिरीष वेलणकर, प्रशालेचे प्राचार्य सुधीर अहिवळे व माध्यमिक विभागाचे उपप्राचार्य नितीन जगताप, ज्युनिअर विभागाचे उपप्राचार्य सोमनाथ माने व पर्यवेक्षिका सौ. पूजा पाटील, क्रीडा समिती सचिव सचिन धुमाळ व शिक्षक वृंद यांनी अभिनंदन केले व पुढील स्पर्धेस शुभेच्छा दिल्या.


Back to top button
Don`t copy text!