
दैनिक स्थैर्य | दि. १७ ऑगस्ट २०२६ | कोल्हापूर |
कोल्हापूरला कायमस्वरूपी खंडपीठ लवकरच होणार असून ती आता केवळ एक औपचारिकता उरली आहे, असे प्रतिपादन भारताचे निवृत्त सरन्यायाधीश भूषण आर. गवई यांनी रविवारी येथे केले.
कोल्हापूर येथे स्थापन झालेल्या मुंबई उच्च न्यायालयाच्या सर्किट बेंचचा वर्षपूर्ती सोहळा आयोजित करण्यात आला होता. यावेळी गवई मार्गदर्शन करताना ते बोलत होते.
यावेळी मुंबई उच्च न्यायालयाचे प्रभारी मुख्य न्यायमूर्ती रवींद्र व्ही. घुगे, मुंबई उच्च न्यायालयाचे वरिष्ठ प्रशासकीय न्यायमूर्ती ए. एस. गडकरी, न्या. सुमन श्याम, न्या. मकरंद कर्णिक, सर्किट बेंचच्या वरिष्ठतम न्या. शर्मिला यू. देशमुख, अॅडिशनल सॉलिसिटर ऑफ इंडिया अनिल सिंह, अॅडव्होकेट जनरल मिलिंद साठे यांच्यासह पालकमंत्री प्रकाश आबिटकर, खासदार छत्रपती शाहू महाराज, आमदार अशोक माने, महापौर रुपाराणी निकम, विधी व न्याय विभागाचे प्रधान सचिव व विधि परामर्शी एस. सी. खती, माजी आमदार मालोजीराजे छत्रपती उपस्थित होते.
वर्षभराच्या कालावधीत दाखल झालेल्या १४ हजारहून अधिक प्रकरणांपैकी १२ हजारहून अधिक प्रकरणांमध्ये न्यायदानाची प्रक्रिया पूर्ण झाली आहे. यातूनच सर्किट बेंचचे महत्त्व अधोरेखित होते. औरंगाबाद व नागपूरपेक्षा अधिक अद्ययावत पायाभूत सुविधा उपलब्ध होण्यासाठी शासन सर्वोतोपरी सोबत राहील, असा विश्वास गवई यांनी व्यक्त केला. मुंबई उच्च न्यायालयाचे प्रभारी मुख्य न्या. घुगे यांनी औरंगाबाद खंडपीठाप्रमाणेच कोल्हापूर खंडपीठही महत्त्वपूर्ण कामगिरी करून त्यांच्या स्थापनेची गरज व महत्त्व अधोरेखित करेल, असे सांगितले.
कोल्हापूरचे पालकमंत्री प्रकाश अबिटकर म्हणाले, कोल्हापूर खंडपीठाची इमारत, प्रशासकीय कार्यालय, न्यायाधीशांची निवासस्थाने, कर्मचारी निवासस्थाने तसेच इतर अनुषंगिक बाबींसाठी विधि व न्याय विभाग, महाराष्ट्र शासन यांना एकूण ७५ एकर जमीन उपलब्ध करून दिली आहे. या जागेचा सातबारा अबिटकर यांनी न्या. घुगे यांच्याकडे सुपुर्द केला. न्यायमुर्ती मकरंद कर्णिक, महाराष्ट्र गोवा बार असोसिएशन सदस्य विवेक घाडगे, कोल्हापूर बेंच कृती समितीचे अध्यक्ष राजेंद्र मंडलिक यांची भाषणे झाली. कोल्हापूर, सांगली, सातारा, सोलापूर, रत्नागिरी ,सिंधुदुर्ग येथील बार असोसिएशनच्या अध्यक्षांचा भूषण गवई यांच्या हस्ते मानपत्र देऊन सन्मान करण्यात आला .
यावेळी न्या. भारती डांगरे, न्या. माधव जामदार, न्या. शिवकुमार दिघे, न्या. राजेश पाटील, न्या. संजय देशमुख, न्या. एस. डी. चपळगावकर, न्या. शलैश ब्रम्हे, न्या. अभय मंत्री, न्या. अश्विन भोबे, न्या. निरज धोटे, न्या. रणजीत भोसले, न्या. अजित कडेठाणकर, न्या. संदेश पाटील, जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड, पोलीस अधिक्षक निलोत्पल, महाप्रबंधक एस. सी. मुघाटे, कर्त्यव्य अधिकारी तथा प्रबंधक कोल्हापूर सर्किट बेंच व्ही. आर. कचरे, विधी सल्लागार नि- सहसचिव विलास गायकवाड, प्रबंधक तथा मुख्य न्यायमुर्तीचे सचिव ए. टी. काले यांच्यासह महाराष्ट्र गोवा बार असोसिएशनचे सदस्य विवेक घाडगे, संग्राम देसाई, मिलिंद थोबडे, सर्किट बेंचचे कार्याध्यक्ष श्रीकृष्ण गनबावले, तेजपाल इंगळे कार्यक्षेत्रातील सर्व जिल्ह्यातील बार असोशिएशनच्या अध्यक्षांसह सहाही जिल्ह्यातील विधीज्ञ, पक्षकार आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
