
फलटण नगरपरिषद आणि स्वराज्य फाउंडेशनतर्फे शनिनगर येथे भव्य नागपंचमी सोहळा आयोजित करण्यात आला असून महिलांसाठी लकी ड्रॉ व बक्षिसांचे खास आकर्षण ठेवण्यात आले आहे.
स्थैर्य, फलटण, दि. १७ ऑगस्ट : फलटण नगर परिषद आणि स्वराज्य फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने शनी नगर येथे आज, सायंकाळी ५ वाजता भव्य नागपंचमी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. नगराध्यक्ष समशेरसिंह नाईक-निंबाळकर आणि जिल्हा परिषदेच्या माजी सदस्या सौ. जिजामाला रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांच्या पुढाकारातून हा सोहळा पार पडत आहे. प्रतिवर्षीप्रमाणे यंदाही श्रद्धेचा आणि परंपरेचा भाग म्हणून हा उत्सव अत्यंत उत्साहात साजरा केला जाणार असल्याची माहिती नगरसेविका कु. सिद्धाली अनुप शहा यांनी दिली.
नागपंचमीचे महत्त्व व परंपरा:
या सणाचे महत्त्व विशद करताना नगरसेविका कु. सिद्धाली शहा यांनी सांगितले की, “श्रावण महिन्यातील अत्यंत महत्त्वाचा आणि पवित्र सण म्हणजे नागपंचमी. भारतीय संस्कृतीत निसर्गातील प्रत्येक घटकाविषयी कृतज्ञता व्यक्त केली जाते, त्याचाच एक भाग म्हणून या दिवशी नागदेवतेची मनोभावे पूजा केली जाते. शेतकर्यांचा मित्र असणाऱ्या सापाला संरक्षण देण्याचा आणि निसर्गाचा समतोल राखण्याचा मोठा संदेश हा सण देतो. या दिवशी महिला एकत्र येऊन फेर धरतात, झोके घेतात, पारंपरिक खेळ खेळतात आणि आनंदोत्सव साजरा करतात. याच परंपरेचे जतन करण्यासाठी या भव्य उत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.”
पूजेची उत्तम व्यवस्था आणि लकी ड्रॉचे आकर्षण:
शनिनगर येथे महिलांना श्री नागदेवतेच्या पूजनासाठी कोणतीही गैरसोय होऊ नये, यासाठी नगराध्यक्ष समशेरसिंह नाईक-निंबाळकर यांनी जातीने लक्ष घालून योग्य ती खबरदारी घेण्याच्या आणि विशेष व्यवस्था करण्याच्या सूचना प्रशासनाला दिल्या आहेत. पूजेनंतर महिलांच्या मनोरंजनासाठी विविध उपाययोजना करण्यात आल्या असून, स्वराज्य फाउंडेशनच्या माध्यमातून या ठिकाणी भव्य ‘लकी ड्रॉ’ आणि बक्षिसांचे वाटप देखील करण्यात येणार आहे. यामुळे महिलांसाठी हा उत्सव अधिकच रंगतदार ठरणार आहे.
घरोघरी जाऊन आग्रहाचे निमंत्रण:
या सोहळ्यासाठी जास्तीत जास्त महिलांनी सहभागी व्हावे, यासाठी माऊली फाउंडेशनच्या माध्यमातून विशेष प्रयत्न केले जात आहेत. फाउंडेशनच्या संचालिका फलटणच्या जुन्या गावठाण भागात घरोघरी जाऊन प्रत्येक महिलेला सौ. जिजामाला रणजितसिंह नाईक-निंबाळकर आणि युवा नेत्या सौ. मनीषाताई नाईक-निंबाळकर यांच्या वतीने आग्रहाचे निमंत्रण देत आहेत, अशी माहितीही कु. सिद्धाली शहा यांनी दिली.
तरी आज सायंकाळी ५ वाजता शनिनगर येथे होणाऱ्या या भव्य नागपंचमी सोहळ्यास शहरासह परिसरातील सर्व महिलांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे जाहीर आवाहन फलटण नगरपरिषदेच्या नगरसेविका कु. सिद्धाली अनुप शहा यांनी केले आहे.
