पुण्यातील शाळा १ फेब्रुवारीपासून सुरू होणार


स्थैर्य, पुणे, दि.२३ : कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर शाळा अद्यापही बंद असून विद्यार्थी ऑनलाइन शिक्षण घेत आहेत. दरम्यान पुणे शहरातील पाचवी ते आठवीपर्यंतचे वर्ग १ फेब्रुवारीपासून सुरू करण्यास परवानगी देण्यात आली आहे. पुणे महापालिका अतिरिक्त आय़ुक्त रुबल अग्रवाल यांनी ही माहिती दिली आहे. याआधी २४ डिसेंबरपासून नववी ते बारावीपर्यंतचे वर्ग सुरु करण्यास परवानगी देण्यात आली होती. महापालिकेकडून यासंबंधी अधिकृत पत्रक काढण्यात आले आहेत.

पुणे महापालिका क्षेत्रातील सर्व प्रकारच्या शाळेत इयत्ता पाचवी ते इयत्ता आठवीचे वर्ग दिनांक १ फेब्रुवारीपासून शालेय शिक्षण आणि क्रीडा विभाग, मार्गदर्शक सूचना आणि अटींचं पालन करत सुरु ठेवण्यास परवानगी देण्यात आली आहे. दरम्यान यावेळी मार्गदर्शक सूचनांचं पालन करणं आवश्यक असणार आहे.

शाळेतील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचा-यांनी कोव्हिड १९ साठीची आरटीपीसीआर चाचणी बंधनकारक असून चाचणीचे प्रयोगशाळेने दिलेले प्रमाणपत्र शाळा व्यवस्थापनाने परिमंडळ वैद्यकीय अधिकारी आणि क्षेत्रीय वैद्यकीय अधिकारी यांना सादर करणं आवश्यक असणार आहे.याशिवाय वर्गात तसंच स्टाफरुममधील बैठकव्यवस्था शारीरिक अंतराच्या नियमानुसार ठेवावी लागणार आहे. वर्गात एका बाकावर एक विद्यार्थी याप्रमाणे नावासहित बैठक व्यवस्था करावी लागणार आहे. विद्यार्थ्यांनी शाळेत उपस्थित राहण्यापूर्वी त्यांच्या पालकांची लेखी सहमती शाळा प्रमुखांनी प्राप्त करुन पर्यवेक्षक प्राथमिक शिक्षण विभागाला सादर करणं बंधनकारक आहे. तसंच वर्ग बंद खोल्यांमध्ये भरवता येणार नाही. हवा बाहेर जाण्यासाठी दरवाजे आणि खिडक्या उघड्या असतील याची काळजी शाळेने घ्यायची आहे.

ठाणे जिल्ह्यातील शाळा २७ जानेवारीपासून सुरु होणार

ठाणे जिल्ह्यातील ग्रामीण भागातील सर्व माध्यमांच्या व सर्व व्यवस्थापनांच्या तसेच आश्रमशाळा शाळा २७ जानेवारपासून सुरु करण्याचे निर्देश पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज दिले. ठाणे जिल्ह्यातील सर्व माध्यमांच्या व सर्व व्यवस्थापनांच्या शाळा विद्यार्थ्यांसाठी दि. १६ जानेवारी पर्यंत बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले होते. परंतु आता ठाणे जिल्ह्यातील ग्रामीण भागातील सर्व व्यवस्थापनाच्या ५वी ते १२ वी पर्यतच्या शाळांसह आश्रमशाळा सुरु करण्याचे निर्देश पालकमंत्री यांनी संबंधित यंत्रणांना दिले आहेत. शहरी भागांतील सर्व शाळांबाबत स्वतंत्रपणे राज्य शासनाच्या निर्देशांप्रमाणे निर्णय घेण्यात येतील. तसेच अंबरनाथ व कुळगाव बदलापुर नगरपालिका क्षेत्रातील शाळांबाबत वेगळे निर्देश देण्यात येतील. शालेय शिक्षण विभागाच्या निर्देशांचे पालन करणे संबंधित शाळा प्रशासनावर बंधनकारक असेल असेही जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांनी स्पष्ट केले आहे.


Back to top button
Don`t copy text!