वैद्यकीय अधिकाऱ्यांचे खासगी दवाखान्यांशी साटेलोटे; भाजपच्या नगरसेवकाचा गंभीर आरोप

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

 

स्थैर्य, वडूज, दि.२१: येथील ग्रामीण रुग्णालयाच्या चुकीच्या कारभाराची तत्काळ सखोल चौकशी करून कारभारात सुधारणा करावी, या मागणीसाठी येथील नगरपंचायत भाजपचे नगरसेवक अनिल माळी यांनी आरोग्यमंत्री राजेश टोपे, जिल्हाधिकारी शेखर सिंह यांच्याकडे धाव घेतली आहे.

याबाबतचे निवेदन श्री. माळी यांनी दिले. त्यातील माहिती अशी, येथील ग्रामीण रुग्णालयामध्ये कोविड सेंटर उभारण्यात आले आहे. या ठिकाणी कोरोनाच्या रॅपिड टेस्ट केल्या जात आहेत. शासनाने 45 बेडच्या कोविड रुग्णालयास परवानगी दिली आहे. मात्र, रॅपिड टेस्टमध्ये पॉझिटिव्ह आलेल्या रुग्णांपैकी काही मोजकेच रुग्ण घेऊन इतर रुग्णांना साताऱ्याच्या शासकीय रुग्णालयात अथवा मायणी येथील हॉस्पिटलमध्ये जाण्याचा सल्ला दिला जात आहे. रुग्णांची गैरसोय टाळण्यासाठी नगरपंचायतीमार्फत या ठिकाणी चार युनिटचे नवीन शौचालय बांधून दिले आहे. जनरेटर सुरू करून 24 तास लाइटची सुविधाही दिली आहे. 

ऑक्‍सिजन बेडसाठी लागणारी सर्व सुविधा नगरपंचायतीने दिली आहे. मात्र, ग्रामीण रुग्णालयातील अधिकारी, डॉक्‍टर्स व स्टाफकडून मोजक्‍याच रुग्णांना दाखल करून घेतले जात आहे. ही बाब अत्यंत गंभीर आहे. अपघातात जखमी झालेल्या रुग्णांना खासगी दवाखान्यात जाण्याचा सल्ला दिला जात आहे. त्यामुळे वैद्यकीय अधिकाऱ्यांचे खासगी दवाखान्यांशी साटेलोटे असल्याचा संशय आहे. रुग्णालयात फक्त रॅपिड टेस्टच केली जात आहे. आर. टी. पी. सी. आर. किटची उपलब्धता असतानाही ही टेस्ट करण्यात येत नाही. चुकीचा कारभार करणाऱ्या वैद्यकीय अधिकाऱ्यांवर तसेच संबंधित विभागातील कर्मचाऱ्यांवर कठोर कारवाई करावी, अन्यथा नागरिकांच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही श्री. माळी यांनी दिला आहे. 

नगरसेवक माळी यांनी या कामकाजाबाबत जिल्हा शल्यचिकित्सकांशी संपर्क साधला असता त्यांनी वरिष्ठांकडे तक्रार करून या रुग्णालयातील वैद्यकीय अधिकाऱ्यांवर कारवाई करून दोन वेळा निलंबितही केले आहे. मात्र, तरीही कामकाजात सुधारणा होत नसेल तर वरिष्ठांकडे संपर्क साधावा, अशी सूचना केली.


प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Don`t copy text!